कल्याण : कल्याण पश्चिमेतील बैलबाजार भागातील एका टिश्युपेपर कंपनीत तरूणीचा गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत या कंपनीतील मालकासह दोन कामगारांनी विनयभंग केला. या तरूणीला पर्यटनासाठी जाण्याचे आमिष दाखवून तिला उत्तरप्रदेशात नेऊन तिचा तेथेही विनयभंग केल्याची तक्रार या तरूणीने महात्मा फुले पोलीस ठाण्यात केली आहे.
ही तरूणी बैलबाजारातील परिसरात राहते. ती इयत्ता दहावीत शिक्षण घेत आहे. फेब्रुवारी ते जुलै या कालावधीत विनयभंगाचा प्रकार घडला आहे. मेहबुब शेख, गगन कांदू, सोनी कांदू (रा. जेठा कम्पाऊंड, बैलबाजार, मूळ गाव- कुशीनगर, गोरखपूर, उत्तरप्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत.
हेही वाचा…कल्याण पूर्व विधानसभेत गणपत गायकवाड उमेदवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे सूतोवाच
पोलिसांनी सांगितले, आरोपींनी पीडित तरुणीला आपल्या बैलबाजारातील जेठा कम्पाऊंडमधील टिश्यूपेपर कंपनीत काम आहे. या कामाच्या बदल्यात तुला वेतन मिळेल असे सांगून बोलावून घेतले. ही तरूणी कंपनीत आल्यावर आरोपी मालक मेहबुब शेख याने पीडित तरूणीशी लगट करून तिचा विनयभंग केला. हा प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्या भावंडांना मारण्याची धमकी दिली. या प्रकाराने पीडित तरूणी घाबरून गेली.
या प्रकारानंतर याच कंपनीतील कामगार गगन उर्फ पंकज कांदू याने पीडितेचा विनयभंग केला. मेहबुब शेख याच्या सांगण्यावरून पंकज आणि सोनी कांदू यांनी पीडितेला आपण बाहेरगावी फिरण्यासाठी जाऊ असे सांगितले. पीडितेला कल्याण रेल्वे स्थानक येथे बोलावून तिला सोबत घेऊन आरोपी पंकज आणि सोनी कांदू हे उत्तरप्रदेशातील कुशीनगर येथील त्यांच्या राहत्या घरी गेले. तेथे गगन उर्फ पंकज याने मेहुबुब याच्या सांगण्यावरून आपल्याशी लग्न केल्याचा देखावा निर्माण केला. आपल्या सोबत विवाह झाल्याची छायाचित्रे मोबाईलमध्ये काढली. ही छायाचित्रे आरोपींनी समाजमाध्यमांवर सामायिक करून पीडितेची बदनामी केली. या सगळ्या प्रकाराने पीडिता घाबरून गेली. कुशीनगर येथे गगन याच्या घरी असताना तेथेही गगन उर्फ पंकज याने पीडितेचा विनयभंग केला.
हेही वाचा…कल्याण रेल्वे स्थानकात महिलेला एकटे सोडून मित्र पळाला
उत्तप्रदेशातून परत कल्याणमध्ये आल्यावर कुटुंबीयांना घडला प्रकार पीडितेने सांगितला. कुटुंबीयांच्या पुढाकाराने पीडितेने महात्मा फुले पोलीस ठाण्यात आरोपींविरुध्द तक्रार केली. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून फरार आरोपींचा तपास सुरू केला आहे.