कल्याण- ‘मी एक दक्ष नागरिक बोलतोय, मला कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी बाजारपेठे मधील कुंडीमध्ये बाॅम्ब दिसला आहे. तो बाॅम्ब फुटण्याची शक्यता आहे. त्या कचराकुंडीच्या आजुबाजुला लोक आहेत,’ अशी माहिती कोळसेवाडी पोलिसांना देऊन पोलिसांची तारांबळ उडविणाऱ्या आणि अफवा पसरविणाऱ्या एका १९ वर्षाच्या तरुणाला पोलिसांनी गुरुवारी अटक केली.

हेही वाचा <<< भोंदू महिलेने वृध्दाला १५ लाखाला लुटले; डोंबिवली जवळील खोणी पलावामधील घटना

नीलेश फड असे आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुरुवारी एका नागरिकाने फोन करुन कोळसेवाडीतील कचराकुंडीत बाॅम्ब ठेवल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच पोलिसांची तारांबळ उडाली. अनुचित प्रकार टाळण्यासाठी कोळसेवाडी पोलिसांचे एक पथक तात्काळ घटनास्थळी गेले. अचानक पोलीस बाजारपेठेत मोठ्या संख्येने आल्याने बाजारपेठेतील नागरिक आश्चर्यचकित झाले.

हेही वाचा <<< डोंबिवली, कल्याण, आसनगाव रेल्वे स्थानकांमध्ये पावसाचे पाणी छतावरुन थेट फलाटांवर

पोलिसांनी कचराकुंडीला घेराव घालून लगत व्यवसाय करत असलेल्या फेरीवाल्यांना, नागरिकांना बाजुला हटविले. पोलीस कचराकुंडीत काय करतात, अशी चर्चा सुरू झाली. मिळालेल्या माहितीप्रमाणे कचराकुंडीत खरच बाॅम्ब आहे का याचा शोध पोलिसांनी सुरू केला. कचराकुंडीतील प्रत्येक वस्तुची बारकाईने तपासणी केल्यावर पोलिसांना तेथे काही आढळले नाही. अफवा पसरविण्यासाठी कोणीतरी हा प्रकार केला आहे, हे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी पोलीस ठाण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकांचा सत्य ओळख संपर्क यंत्रणेवरुन शोध घेतला. तो तरुण कल्याण मधील असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे त्याला ताब्यात घेतले. त्याला योग्य समज देऊन नंतर सो़डून देण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Story img Loader