बदलापूर : कार्यकर्त्यांनी मागणी केली आणि पक्षाने आदेश दिला तर मुरबाड विधानसभाही लढेल, असे वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी केले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे पाटील कथोरे वाद आता विधानसभेतही पहायला मिळतो की काय असा प्रश्न उपस्थित होते आहे. शहापूर विधानसभा मतदारसंघाची भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीवर बोलताना पाटील यांनी हे वक्तव्य केले.
लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेल्या कपिल पाटील यांनी आपल्या पराभवाचे खापर थेट आमदार किसन कथोरे यांच्यावर फोडले. त्यानंतर कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांच्या वाकयुद्ध सुरू आहे. पराभवानंतरही कपिल पाटील मतदारसंघात सक्रीय आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी मुरबाड विधानसभा मतदारसंघावर दावा केला. त्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडल्याचे बोलले जात होते. कथोरे यांना बदलापूर शहर आणि ग्रामीण भागातून आव्हान निर्माण केले जात असल्याची चर्चा रंगली होती. त्यातच आता माध्यमांशी बोलताना कपिल पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे.
हेही वाचा…कोंडीमुळे कल्याण पश्चिमेतील रस्ते, चौकांमध्ये वाहनांचा रांगा
शहापूर विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळावा अशी मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यावर बोलताना पाटील म्हणाले की, ज्याप्रमाणे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कल्याण पूर्व आणि मुरबाड विधानसभा मतदारसंघावर दावा केला. त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांनी मागणी केल्यास गैर काय, असे सांगितले. त्याचवेळी बोलताना पुढे ते म्हणाले की मुरबाड मतदारसंघातील मतदारांनी मला प्रेम दिले. मला १ लाख ६ हजार मते दिली आहे. लोकांचा आग्रह असला तर मुरबाड विधानसभा लढणार. पक्षाकडे तिकीट मागणार. पक्षाने तिकीट निवडणूर दिल्यास लढणार, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली. पक्षाने संधी नाही दिली तर पक्षाचा जो उमेदवार असेल त्याच काम करणार, असे पाटील म्हणाले. आम्ही महायुतीत आहोत. महायुतीचा जो निर्णय असेल तो मान्य असेल. पण जागा मागणे काही गैर नाही, असेही पाटील पुढे म्हणाले. पाटील यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. कथोरे यांचे चारही बाजूने कोंडी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जाते.