ठाणे : कपिल पाटील कोणत्याही पदावर नसताना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने २५ ते ३० हजार जण प्रेम व्यक्त करतात. ते माजी केंद्रीय राज्यमंत्री झाले असले तरी जोपर्यंत जनतेचे प्रेम आहे तोपर्यंत ते कधीही माजी होणार नाहीत, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. पाटील यांचे राजकीय पुनर्वसन होणार का याबाबतही अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. विशेष म्हणजे भाजपाचेच मुरबाडचे आमदार किसन कथोरे आणि कपिल पाटील यांच्या विस्तवही जात नाही. कथोरे यांनी काही महिन्यांपूर्वी काही माजी कधीही आजी होणार नाहीत, असे वक्तव्य केले होते.

ठाणे जिल्हा गेल्या काही वर्षात भाजपच्या दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये वाद निर्माण झाले. माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांच्यात हे वाद अनेक दिवसांपासून सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात कथोरे यांनी विरोधात काम केल्याचा आरोप कपिल पाटील यांनी केला होता. त्यामुळे माझा पराभव झाला असा उघड दावाच पाटील यांनी केला होता. त्यानंतर पाटील यांनी कथोरे यांच्याविरूद्ध जुन्या निष्ठावंताची मोट बांधण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा होती. कथोरे यांच्या पराभवासाठी ही आघाडी होती असा कथोरे समर्थकांचा दावा होता. अनेक प्रयत्नांनंतरही कथोरे मोठ्या फरकाने विजयी झाले. विजयानंतरच्या पहिल्याच भाषणात जे जे माजी विरोधात आले, त्यांना आजी होऊ देणार नाहीत, असा इशारा कथोरे यांनी दिला होता. या इशाऱ्याची मोठी चर्चा रंगली होती. त्यानंतर विविध विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये खटके उडाल्याचे दिसून आले. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलापुरात येत किसन कथोरे यांच्या पाठिशी उभे असल्याचे स्पष्ट केले होते. त्याचवेळी कथोरे योग्य वेळी मंत्री होतील असेही वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर पाटील कथोरे यांच्या वादात कथोरे यांच्या पारड्यात वजन टाकल्याचे बोलले जात होते.

मात्र दोनच दिवसांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत क्रिकेट स्पर्धेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी कपिल पाटील यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. भव्यता हा कपिल पाटील यांचा स्वभाव असून, त्यांच्याकडून भव्य कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ते कोणत्याही पदावर नसतानाही २५ ते ३० हजार नागरिकांनी वाढदिवसाच्या दिवशी प्रेम व्यक्त केले होते. निवडणूका येतात-जातात. ते माजी केंद्रीय राज्यमंत्री झाले असले, तरी जोपर्यंत जनतेचे प्रेम आहे, तोपर्यंत ते कधीही माजी होणार नाहीत, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या वक्यव्यामुळे आता अनेक चर्चा रंगल्या आहेत.

फडणवीसांच्या वक्तव्यानंतर त्यांनी दोन्ही नेत्यांच्या पारड्यात समसमान वजन टाकल्याचे बोलले जाते. त्याचवेळी कपिल पाटील यांच्या राजकीय पुनर्वसनाचीही चर्चा रंगू लागली आहे. पाटील यांची आता कुठे वर्णी लावली जाते याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. तर हे संकेत असल्याची भावना पाटील समर्थकांनी व्यक्त केली आहे.

Story img Loader