घोडबंदर मार्गावरील कापूरबावडी जंक्शन येथे उभारण्यात आलेला उड्डाणपूल पावसाळय़ापूर्वी सुरू करण्याच्या जोरदार हालचाली ‘महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळा’च्या अधिकाऱ्यांनी सुरू केल्या आहेत. भिवंडी-नाशिक मार्गावर या उड्डाणपुलाला ‘यू टर्न’चा पर्याय असला तरी याठिकाणी स्लॅबच्या काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने उड्डाणपूल पूर्ण क्षमतेने सुरू करणे अद्याप शक्य झालेले नाही. त्यामुळे घोडबंदर मार्गावरील ठाणे शहराच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची कापुरबावडी नाक्यावर अभुतपूर्व कोंडी होत असल्याचे चित्र आहे. तांत्रिक अडचणी दूर होऊन हा उड्डाणपूल पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास घोडबंदरहून ठाण्याकडे येणाऱ्या वाहनांना उड्डाणपुलावरून वळसा घालणे शक्य होणार आहे.
घोडबंदर मार्गावर झपाटय़ाने होत असलेले नागरीकरण लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने काही वर्षांपूर्वी या मार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला. या मार्गावरील तीन उड्डाणपुल पूर्ण क्षमतेने सुरू झाले असले तरी कापुरबावडी उड्डाणपुलाची एक मार्गिका तांत्रिक कारणांमुळे अद्याप सुरू करता आली नाही. मध्यंतरी या कामाची पाहणी करून पालकमंत्री एकनाथ िशदे यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या कामाची सविस्तर चौकशी सुरू असली तरी पावसाळय़ापूर्वी ही मार्गिका सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही वळण मार्गिका बंद असल्याने कापूरबावडी जंक्शन परिसरात वाहनांची मोठी कोंडी होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. घोडबंदर भागातून ठाणे शहराच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना कापूरबावडी उड्डाणपुलावरुन वळसा घेऊन ठाण्याकडे जाणे शक्य होणार आहे. मात्र, मार्गिका सुरू नसल्याने काही वाहने उड्डाणपुलावरुन थेट नाशिक महामार्गाच्या दिशेने जाऊ लागली आहे. त्यापैकी काही वाहने रुस्तमजी आणि लोढा संकुलात प्रवेश करण्यासाठी उड्डाणपूल उतरून महामार्गाच्या दिशेने पुन्हा संकुलांकडे वळण घेऊ लागल्याने महामार्गावर कोंडी होऊ लागली आहे. या उड्डाणपुलाच्या सर्व मार्गिका खुल्या झाल्याने वाहतूक सुरळीत होईल, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या प्रवाशांचा त्यामुळे भ्रमनिरस होऊ लागला आहे. हे लक्षात घेऊन वळण मार्गिका लवकर सुरू करून कापूरबावडी उड्डाणपुलावरील वाहतुकीत सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.