कल्याण : गुरुवारी सकाळी साडे सहा वाजल्यानंतर कर्जतहून मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल विहित वेळेत न आल्याने या लोकलवर अवलंबून असणाऱ्या बदलापूर ते कल्याण, डोंबिवली आणि पुढील रेल्वे स्थानकांमधील प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. बदलापूरच्या पुढे कर्जतकडे लोकल जात नसल्याने प्रवाशांचे हाल झाले.

सकाळच्या कर्जतहून येणाऱ्या बहुतांशी लोकल जलद, अति जलद आहेत. त्यामुळे कल्याण, डोंबिवलीतील प्रवासी या लोकलला सर्वाधिक पसंती देतात. या लोकल ठरल्या वेळेत न आल्याने प्रवाशांना त्यांच्या नियोजित वेळेच्या नंतरच्या लोकल पकडून मुंबईचा प्रवास करावा लागला. कर्जत लोकल का येत नाहीत ही चर्चा फलाटांवर प्रवाशांमध्ये सुरू होती. तसेच, कल्याणकडून कर्जत दिशेने जाणाऱ्या लोकल बदलापूरपर्यंत धावत होत्या. या गोंधळात प्रवाशांचे हाल झाले.

मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी भिवपुरी रोड स्टेशन ते कर्जत रेल्वे स्थानकाच्या दरम्यान काही तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे या रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या लोकल, लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. तांत्रिक बिघाड दूर करून वाहतूक पूर्ववत करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

या तांत्रिक गोंधळामुळे डेक्कन क्विन, इंद्रायणी, सिंहगड, इंटरसिटी एक्सप्रेस आणि इतर एक्सप्रेस कल्याण ते नेरळ दरम्यान जागोजागी थांबून ठेवण्यात आल्या आहेत. या गोंधळाचा कल्याण ते कर्जत रेल्वे मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. या रेल्वे मार्गावरील दोन्ही बाजुची वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई सीएसएमटीकडे जाणाऱ्या कर्जत जलद, अति जलद लोकल येत नसल्याने प्रवाशांनी बदलापूर, टिटवाळा, आसनगाव, कसारा येथून येणाऱ्या जलद, अति जलद लोकलमधून प्रवास सुरू केला होता. सकाळीच पुणे येथे जाणाऱ्या आणि पुण्याहून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचे या तांत्रिक गोंधळात हाल झाले. या गोंधळामुळे काही प्रवाशांनी कर्जत भागात जाण्यासाठी कल्याण, बदलापूर येथून एसटी बस, खासगी वाहन सेवेतून प्रवास सुरू केला होता.

Story img Loader