लोकसत्ता प्रतिनिधी
अंबरनाथः अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकपासून जवळच असलेल्या विजेच्या साहित्य खोलीला दुपारच्या सुमारास लागलेल्या आगीमुळे कर्जत मार्गावरची रेल्वे सेवा ठप्पा झाली होती. सुमारे एक तास हा मार्ग ठप्प असल्याची माहिती प्रवाशांनी दिली आहे. त्याचा प्रवाशांना फटका बसला.
अंबरनाथ रेल्वे स्थानकात कर्जत दिशेला फलाट क्रमांक एकच्या समोर रेल्वे रुळाच्या बाजूलाच रेल्वेची विद्युत साहित्य ठेवण्याची खोली आहे. या खोलीमध्ये असलेल्या वाहिन्यांना शनिवारी दुपारच्या साडे तीन ते चारच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमुळे धुराचे लोट मोठ्या प्रमाणात निघू लागले. त्यामुळे कर्जतकडे जाणारा रेल्वे मार्ग बंद करण्याची वेळ रेल्वे प्रशासनावर आली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.
सुमारे चाळीस मिनीटे आग विझवण्यात गेली अशी माहिती अग्नीशमन दलाचे प्रमुख भागवत सोनोने यांनी दिली. या खोलीत असलेल्या विद्युत साहित्य, वाहिन्यांमुळे आग लागल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र यामुळे कर्जतकडे जाणाऱ्या रेल्वे मार्ग सुमारे तासाभर बंद होता. अंबरनाथ रेल्वे स्थानकात एक मेल एक्सप्रेस उभी करून ठेवण्यात आली होती. त्यामागे लोकलही खोळंबल्या होत्या. त्याचा फटका प्रवाशांना बसला. शनिवार असल्याने गर्दीचे प्रमाण कमी होते. तरीही काही वेळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती.