कल्याण – मध्य रेल्वेच्या खर्डी आणि उंबरमाळी रेल्वे स्थानकांच्या दरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाल्याने कसाराकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या लोकल, लांबपल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक ठप्प झाली होती. एक तासाच्या अवधीनंतर इंजिन दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

मध्य रेल्वेच्या खर्डी आणि उंबरमाळी रेल्वे स्थानकांच्या दरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये मंगळवारी सकाळी ११.२० वाजता बिघाड झाला. कसाराकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या लोकल, लांबपल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक ठप्प झाली होती. तर, सीएसएमटीकडून कसाराकडे जाणाऱ्या लोकल, एक्सप्रेस वाहतूक सुरळीतपणे सुरू होती. मालगाडीच्या इंजिनमधील बिघाड दुरुस्तीचे काम रेल्वेच्या तंत्रज्ञांनी तातडीने हाती घेतले.

हेही वाचा – कल्याणमध्ये महावितरणकडून बेकायदा बांधकामांना वीज पुरवठा, निर्भय बनोच्या पदाधिकाऱ्यांचे उपोषण

बंद पडलेल्या मालगाडीच्या पाठीमागे कसारा-सीएसएमटी लोकल, भुवनेश्वर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, धुळे-दादर एक्सप्रेस खोळंबल्या होत्या. नोकरदार वर्ग सकाळी कामावर निघून जातो. यामुळे ११ वाजेनंतर या स्थानकांवर फारशी गर्दी नसते. असे असले तरी कामानिमित्त बाहेर निघालेल्या प्रवाशांचे मात्र हाल झाले.

हेही वाचा – ठाणे जिल्ह्यात १८ हजार पोलिसांचा बंदोबस्त

एक तासाच्या अवधीनंतर इंजिन दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. मागील दोन वर्षांपासून खर्डी ते खडवली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान मालगाडी रुळावरून घसरणे, याच भागात इंजिनमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे. या रेल्वे मार्गाची वरिष्ठांनी पाहणी करावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनेकडून केली जात आहे.

Story img Loader