ठाणे : ठाणे आणि भिवंडी शहरांच्या वेशीवर असलेल्या कशेळी-काल्हेर भागात सोमवारी म्हजणेच आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळपासून वीज पुरवठा खंडीत झाला आहे. गेल्या तीन तासांपासून बत्तीगुल झाल्याने नागरिक हैराण झाले असून इमारतींच्या विद्युत मोटार बंद असल्यामुळे नागरिकांना पाणी टंचाई समस्येचाही सामना करावा लागला. दरम्यान दुपारनंतर वीज पुरवठा सुरळीत होणार असल्याचे टोरंट कंपनीकडून संगण्यात येत आहे.
ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून यामुळे अनेक महामार्गांसह अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. अशाचप्रकारे कशेळी-काल्हेर भागातील रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून यातून येथील नागरिकांना वाट काढत जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडावही सुरू असल्यामुळे येथील नागरिक मेटाकुटीला आले आहेत. सोमवारी म्हजणेच आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळी १२.३० वाजता वीज पुरवठा खंडीत झाला आहे. वीज पुरवठा बंद झाल्यामुळे इमारतीमधील गच्चीवरील टाकीत पाणी सोडण्यासाठी वापरण्यात येणारी विद्युत मोटार बंद झाली आहे. परिणामी सकाळी कामावर जाण्याच्या वेळेत पाणी नसल्यामुळे नागरिकांचे हाल झाले. विजेची समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, तांत्रिक बिघाडामुळे हा वीज पुरवठा खंडीत झाला असून तो दुपारी १२.३० नंतर पुर्वरत होईल, असे टोरंट कंपनीकडून संगण्यात येत आहे.