कस्तुरी गार्डन, टेंभा रुग्णालयाजवळ, भाईंदर (प.)
गृहसंकुल म्हटले की वादविवाद, भांडणे ही आलीच. वार्षिक सभांमध्ये आरोप-प्रत्यारोप, पदाधिकाऱ्यांच्या कारभारावर टीका हेदेखील ओघानेच आले, परंतु भाईंदर पश्चिम येथील कस्तुरी गार्डन सोसायटी याला अपवाद आहे. चार इमारतींच्या या संकुलात तब्बल २४० कुटुंबे राहतात, परंतु सोसायटय़ांच्या नित्यनेमाने होणाऱ्या वार्षिक सभांमधून कोणतेही मोठे वादविवाद होत नाहीत, सर्व सदस्य पदाधिकाऱ्यांच्या कारभारावर विश्वास ठेवतात आणि सर्व कामकाज सामंजस्याने पार पाडले जाते.
कस्तुरी गार्डन हे संकुल अस्तित्वात आले २००८ मध्ये. भाईंदर पश्चिम येथील टेंभा रुग्णालयाच्या बाजुने महापालिकेच्या स्थानिक संस्था कर कार्यालयावरून पुढे जाणाऱ्या रस्त्यावर हे संकुल आहे. संकुलात ओम विहार, साई विहार, सनराइज आणि मथुरा निकेत अशा चार इमारती आहेत. संकुल एकच असले तरी प्रत्येक इमारत वेगवेगळ्या विकासकाने बांधली आहे. प्रत्येक इमारतीत दोन विंग आहेत. रहादारीसाठी चांगले रस्ते, वाहने उभी करण्यासाठी स्वतंत्र जागा, मध्यभागी बगीचा, त्यात मुलांसाठी खेळणी आणि खेळण्यासाठी स्वतंत्र मैदान अशी या संकुलाची रचना आहे. प्रत्येक इमारतीची स्वतंत्र सोसायटी असली तरी चारही इमारतींचे मिळून एक फेडरेशन स्थापन करण्यात आले आहे आणि त्याला कस्तुरी गार्डन हाउसिंग सोसायटीज फेडरेशन असे नाव देण्यात आले आहे. प्रत्येक इमारतीच्या कार्यकारिणीतील दोन पदाधिकारी फेडरेशनवर घेण्यात आले आहेत. पदाधिकाऱ्याला वेळ नसेल तर अशा वेळी सोसायटीमधील क्रियाशील सदस्याला फेडरेशनवर घेण्यात येते. प्रत्येक सोसायटीशी संबंधित निर्णय त्या त्या सोसायटीकडून घेण्यात येत असला तरी संपूर्ण संकुलाशी संबंधित असलेले निर्णय फेडरेशनच्या वतीने घेण्यात येतात.
प्रत्येक सोसायटीच्या आणि फेडरेशनच्या बैठका नियमितपणे घेण्यात येत असतात. लेखापरीक्षणातही नियमितपणे ब दर्जा मिळत असतो. सर्व निर्णय एकमेकांच्या सूचना विचारात घेऊन घेतले जातात आणि त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी केली जाते. मिरा-भाईंदरमध्ये नव्याने उभ्या राहत असलेल्या संकुलांमधील बहुतांश रहिवासी हे मिरा-भाईंदरबाहेरून येत असले तरी कस्तुरीमधले पन्नास टक्के रहिवासी मूळचे मिरा-भाईंदरमधलेच आहेत हे विशेष. हे रहिवासी आधी शहरातील इतर ठिकाणी राहात होते आणि संकुल उभे राहिल्यानंतर ते या ठिकाणी राहायला आले. त्यामुळे संकुलातील बहुतांश रहिवाशांची एकमेकांशी किमान तोंडओळख तरी आहेच. त्यामुळे संकुलातील वातावरण कायम खेळीमेळीचे असते. बहुतांश रहिवासी हे मध्यमवर्गीय परिवारातले आहेत. मिश्र जाती-धर्माच्या या सदस्यांपैकी कोणी छोटे -मोठे व्यावसायिक आहेत तर कोणी नोकरी करतात अशी माहिती संकुलातले सदस्य गोविंद परब यांनी दिली.
संकुलात चारच इमारती असल्या तरी संकुलाचा परिसर मोठा आहे. त्यामुळे त्याच्या सुरक्षेची जबाबदारीदेखील तेवढीच मोठी आहे. प्रत्येक सोसायटीच्या सुरक्षेसाठी दोन सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत आणि सीसीटीव्हीदेखील बसविण्यात आले आहेत. शिवाय फेडरेशनच्या माध्यमातुन संकुलाच्या संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे. त्यामुळे संकुलाच्या आवारात उभ्या असलेल्या वाहनांवरही सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवणे शक्य होत असते.
संकुलाच्या मध्यभागी एक हिरवागार असा बगीचा विकसित करण्यात आला आहे. विविध प्रकारची झाडे लावण्यासोबत लहान मुलांसाठी खेळणीदेखील बसविण्यात आली आहेत. त्यामुळे मोठय़ांसोबतच लहानांनाही विरंगुळ्याचे साधन उपलब्ध झाले आहे. संकुलाच्याच मागच्या बाजुला मोकळा भूखंड आहे. हा भूखंड खरे तर संकुलातीलच मोकळी जागा म्हणून आराखडय़ात दाखविण्यात आला आहे असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. परंतु विकासकाने या भूखंडावर दावा केल्याने तो संकुलाच्या ताब्यात येत नव्हता. याविरोधात संकुलातले सर्व सदस्य एकत्र आले आणि त्यांनी न्यायालयात दावा दाखल केला. न्यायालयाने सध्या या भूखंडाला स्थगिती दिली असून हा भूखंड सध्या संकुलाच्याच वापरात आहे. संकुलाने या ठिकाणी माती भराव करून तो खेळण्यायोग्य बनवला आहे. त्यामुळे मुलांना मैदानी खेळ खेळणे शक्य झाले आहे. सर्व प्रकारचे सण, उत्सव संकुलात उत्साहाने साजरे केले जातात. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, गुरुपौर्णिमा हे सण धडाक्याने साजरे केले जातात. विकासकाने संकुलातील इमारती सोसायटीच्या हाती सोपवताना इमारतीसाठी पावसाळी पाण्याचे नियोजन करणारी यंत्रणा बसवून दिली होती. परंतु हा परिसर खाजणाचा असल्याने या ठिकाणीचे पाणी योग्य नाही परिणामी ही यंत्रणा या ठिकाणी यशस्वी होऊ शकली नाही. त्यामुळे सदस्यांना पाण्यासाठी मात्र पालिकेच्या पाणीपुरवठय़ावरच अवलंबून राहावे लागते. विशेष म्हणजे मीरा-भाईंदर महानगरपालिकेत काम करणारे अनेक अधिकारी या संकुलात राहतात. कोणतीही समस्या उभी राहिली तर हे अधिकारी तात्काळ त्या समस्येवर उपाययोजना होईल अशी व्यवस्था करत असतात.