लोकसत्ता प्रतिनिधी

अंबरनाथ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या भोंगळ कारभारामुळे ५० वर्षांपूर्वी एका शेत जमिनीवर चुकीचा भूसंपादन शेरा पडला. त्याचा फटका एका शेतकऱ्याला बसल्याने संबंधित शेतकऱ्याने कर्जत काटई राज्य महामार्गाची एक मार्गिका बंद केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा रस्ता दुरुस्तीसाठी स्वतः एमआयडीसी प्रशासनाने बंद केला असल्याची बाजू मंडळाकडून सांगितली जाते आहे. मात्र हा रस्ता आपण बंद केल्याचे शेतकऱ्याने सांगितले आहे .मात्र एमआयडीसी आणि शेतकऱ्याच्या वादात प्रवाशांना आणि वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.

अंबरनाथमधून जाणाऱ्या काटई कर्जत राज्य महामार्गासाठी वसार गावातील शेतकऱ्यांची जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने १९७२ साली संपादित केली होती. बारवी धरणातून ठाण्याकडे जाणारी पाण्याची जलवाहिनी आणि राज्य महामार्ग बांधण्यासाठी ही जागा ताब्यात घेतली. मात्र कागदोपत्री नोंद करताना प्रत्यक्ष ताब्यात घेतलेल्या जागेऐवजी रस्त्याच्या बाजूच्या जागेवर एमआयडीसी प्रशासनाने फेरफाराची नोंद केली. त्यामुळे ज्या जागेवर रस्ता आहे ती जागा शेतकऱ्याच्या हातातून गेली. तसेच बाजूच्या जागेवर एमआयडीसीची नोंद असल्यामुळे त्या शेतकऱ्याला काहीही वापर करता येत नाही. अशा दुहेरी कोंडीत शेतकरी अडकले आहेत. या कागदोपत्री गोंधळाबाबत मागील ५० वर्षांपासून शेतकऱ्यांने एमआयडीसीकडे पाठपुरावा केला आहे. मात्र आपली स्वतःची प्रशासनातील चूक सुधारण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला तब्बल पन्नास वर्षे लोटले आहेत. त्यानंतरही चूक दुरुस्त केली जात नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्याने सोमवारी काटई – कर्जत राज्यमार्गावरील एक मार्गीका बंद केली.

हेही वाचा…. कल्याणमध्ये मद्यपींकडून वाहनांची तोडफोड

या शेतकऱ्यांनी या राज्य महामार्गावर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतरही एमआयडीसीकडून कोणतीही हालचाल न झाल्यामुळे अखेर सोमवारी वसार गावातील शेतकऱ्यांनी ही एक मार्गिका बंद केली. यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी एमआयडीसी प्रशासनाला २० दिवसांचा इशारा दिला आहे. या २० दिवसात हा प्रश्न मार्गी न लावल्यास संपूर्ण रस्ता बंद केला जाईल, असा इशारा या शेतकऱ्यानी दिला आहे. ही मार्गिका बंद झाल्याने या राज्य मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. आधीच या मार्गावर नेवाळी ते खोनी या भागात रस्ते काँक्रीट करण्याचे काम सुरू आहे. परिणामी एकच मार्गिका सुरू असून वाहतूक कोंडी होते आहे. त्यात चांगल्या रस्त्याची मार्गिका बंद झाल्याने प्रवासाचा वेळ वाढणार आहे.

हेही वाचा…. गावदेवी भाजी मंडई इमारतीतील दुचाकी वाहनतळ बंदावस्थेच

या राज्यमार्गाची मार्गिका बंद केली जात असताना येथे स्थानिक पोलीस, एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी ही मार्गिका बंद केली असली तरी आम्हीच ही मार्गिका दुरुस्तीच्या कामासाठी बंद केल्याचा दावा एमआयडीसीचे उपअभियंता विजय शेलार यांनी केला आहे. येत्या काही दिवसात दुरुस्ती करून ही मार्गिका खुली केली जाईल, असेही शेलार यांनी सांगितले आहे.

Story img Loader