डोंबिवली : येथील एमआयडीसीतील कावेरी चौकातील पदपथ, रस्ते अडवून उभारण्यात आलेल्या टपऱ्या, या चौकातील फेरीवाले आणि रस्त्याच्या दुतर्फा असलेली दुचाकी, चारचाकी वाहने यामुळे कावेरी चौक हा अपघात प्रवण क्षेत्र झाला आहे. दोन दिवसापूर्वी याच वर्दळीमुळे एका विद्यार्थ्याला या चौकात आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे कल्याण डोंबिवली पालिकने कावेरी चौकातील फेरीवाले आणि बेकायदा टपऱ्या हटविण्याची कारवाई प्राधान्याने करावी, अशी मागणी या भागातील जागरूक नागरिक, राजकीय पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्तांसह ई प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांकडे केली आहे.
एमआयडीसीतील कावेरी चौक सर्वाधिक वर्दळीचा चौक म्हणून ओळखला जातो. या चौकाच्या परिसरात दोन शाळा आहेत. याठिकाणी विद्यार्थी, पालक, त्यांची वाहने, शाळेच्या बस यांची सतत वर्दळ असते. परिसरातील रहिवाशांना खरेदीसाठी हा चौक मध्यवर्ति ठिकाण असल्याने या चौकात सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत फेरीवाले रस्ते, पदपथ अडवून व्यवसाय करतात. अनेक नागरिक या चौकातील रस्त्याच्या दुतर्फा, पदपथालगत दुचाकी, चारचाकी वाहने उभी करून ठेवतात. अनेक टपऱ्या या भागात आहेत. या भागातून जाणाऱ्या पादचारी, वाहन चालकांना सकाळपासून ते रात्रीपर्यंत वाहतूक कोंडी, वर्दळीला तोंड देत जावे लागते.
हेही वाचा…कल्याण-डोंबिवलीत फटाके विक्रीच्या मंचांनी अडविले वर्दळीचे रस्ते, पदपथ
काही वर्षापासून हा त्रास स्थानिक रहिवाशांना परिसरातील शाळा व्यवस्थापनाला सहन करावा लागत आहे. दोन दिवसापूर्वी कावेरी चौकातून जात असलेल्या दोन विद्यार्थ्यांच्या दुचाकीला भरधाव वेगातील एका टेम्पो चालकाने धडक दिली. त्यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. एक जण गंभीर जखमी आहे. या चौकातील फेरीवाल्यांमुळे वाहन चालकांना या भागातून वाहन चालविताना कसरत करावी लागते. शिळफाटा रस्त्यावरून येणारी अनेक वाहने डोंबिवलीत प्रवेश करताना कावेरी चौकातून जातात.
शाळेच्या बस चालकांना शाळेच्या आवारातून बस बाहेर काढताना फेरीवाल्यांच्या दररोजच्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे कावेरी चौकातील फेरीवाले कायमस्वरुपी हटविण्याची मागणी नंदकिशोर परब, तेजस पाटील, मुकेश पाटील, राजू नलावडे, सागर पाटील, गौरव डामरे, अजय घोरपडे, किरण भोसले, संतोष शुक्ला, संजय चव्हाण या जागरूक नागरिक, राजकीय पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्त, ई प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांकडे केली आहे.
हेही वाचा…प्रचार साहित्याच्या दरात वाढ
प्रतिक्रिया
एमआयडीसीतील कावेरी चौकासह घरडा सर्कल भागातील फेरीवाल्यांंवर दररोज कारवाई केली जाते. कावेरी चौकात एकही फेरीवाला बसणार नाही असे नियोजन केले जात आहे. दोन दिवसांपासून कावेरी चौकात एकही फेरीवाला नाही.