ठाणे : तीनशे वर्षांपूर्वीची औरंगजेबाची कबर आताच का महत्वाची वाटायला लागली? केवळ राजकारणासाठी कबरीचा विषय उकरून काढला जात आहे. असे स्पष्ट मत प्रसिद्ध कवयित्री नीरजा यांनी व्यक्त केले.
व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने शनिवारी बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे सद्भावना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी हरवलेले सांस्कृतिक जग पुन्हा आणता येईल का या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. पुढे त्या म्हणाल्या की, ही कबर उखडून काढणे जर इतके महत्त्वाचे वाटत होते. तर हे काम ३०० वर्षांपूर्वीच करायला हवे होते. ज्या छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने छळले त्यांच्या वंशजानी सुद्धा हा विषय उकरून काढला नाही. माणूस मेला तिथेच विषय संपतो. औरंगजेबाचे उद्दातीकरण कोणीही करत नाहीये आणि करणारही नाही. तरीही आजच्या काळात केवळ तरूण पिढीला चिथवण्यासाठी हा मुद्दा घेतला जातो आहे.
महानगरांमधील जीवन बघत आहोत. पण गावाखेड्यामध्ये वाईट परिस्थिती आहे. शिकून सुद्धा आजच्या पिढीला नोकऱ्या मिळत नाहीत. हाताला काम नाही अशा काळात ते कुठे जातील. ही तरुण मुले नोकरी मिळत नसल्याने पक्षांचे कार्यकर्ते झाले आहेत. या पिढीचा राज्यकर्त्यांकडून वापर केला जात आहे. आधीच्या सरकारवर आपल्याला किमान टीका करण्याची मुभा होती. परंतु आता आणीबाणी पेक्षा देखील वाईट परिस्थिती आहे. ९० पर्यंतच्या काळामध्ये अनेक आंदोलन झाली अनेक चळवळी झाल्या या आंदोलनाशी मध्यमवर्गीय जोडला होता. मात्र ९० नंतरचा काळात मध्यमवर्गीय तुटला आणि तो आत्मकेंद्री झाला. मध्यमवर्गीय आता अलिप्त झाला आहे. गेल्या दहा वर्षात आपले आतून खूप नुकसान झाले आहे आणि ते दुरुस्त करायला वेळ लागेल असे त्या म्हणाल्या.
तसेच यावेळी पद्मश्री नाट्यशिक्षक सतीश आळेकर म्हणाले की, २०१४ च्या आधी काय आणि आता काय वर्षांनुवर्ष आम्ही हिंदूच आहोत. परंतु २०१४ नंतर सतत तुम्ही हिंदू आहात असे सांगितले जाते. मला माझा धर्म माहीत नाही का एकीकडे धर्माबद्दल तरुणांमध्ये कुतुहल जागरूक केले जात आहे. तर, दुसरीकडे जातीचे राजकारण सुरू आहे. हा राक्षस तुम्ही कसा आवरणार आहेत. कित्येक शासकीय पदे रिक्त आहेत. समाजात विखंडता आली आहे म्हणून तरुणाईला एकटेपणा जाणवत आहे असे ते म्हणाले.