डोंबिवली – डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील पाटकर रस्त्यावरील डिलक्स दारू विक्री दुकानासमोरच ग्राहक दारू पिऊन धिंगाणा घालत होते. सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यावर हा प्रकार अनेक वर्ष सुरू होता. महिला वर्गाला या रस्त्यावरून जाताना त्रास होत होता. याप्रकरणी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्याकडे अनेक महिलांनी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने आयुक्त डॉ. जाखड यांनी अधिकाऱ्यांना संबंधित दारू विक्रेता आणि उघड्यावर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांवर कारवाईचे आदेश मंगळवारी दिले होते.

आयुक्त डॉ. जाखड यांच्या आदेशावरून परिमंडळ उपायुक्त रमेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार, ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत, साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर आणि रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस यांनी मंगळवारी रात्री अचानक डोंबिवली पूर्वेतील डिलक्स दारू विक्री दुकानासमोर उघड्यावर दारू पिण्यास बसलेल्या, या ग्राहकांना खाद्य पदार्थ पुरविणाऱ्या हातगाडींवरील विक्रेत्यांना कारवाई केली.

हेही वाचा >>> पडघा ग्रामपंचायतीमधील गैरकारभाराविरुद्ध ग्रामस्थांचे साखळी उपोषण, शासकीय जमिनींवरील बेकायदा बांधकामांना अभय

उघड्यावर दारू पिण्यासाठी ग्राहकांनी दुकाना समोरील बाजुला कट्टे केले होते. या कट्ट्यावर ग्राहक मंगळवारी रात्री आठ वाजता दारू पिण्यास बसले असताना रामनगर पोलिसांनी ग्राहकांना प्रसाद देऊन त्यांना तेथून पिटाळून लावले. या ग्राहकांना अंडी, बुरजी पाव, इतर तिखट पदार्थ पुरविणाऱ्या आठ हातगाड्यांवर फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी जप्तीची कारवाई केली. दारू पिऊन ग्राहक पाटकर रस्त्यावरून येजा करणाऱ्या महिलांची छेड काढत होते. अनेक वर्ष हा प्रकार पाटकर रस्त्यावरील दारू विक्री दुकानासमोर सुरू होता.

हेही वाचा >>> मुरबाडमध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई यांना शोधा आणि गावठी कोंबडा बक्षीस मिळवा फलक

दारू विक्रेत्याला नोटीस

पाटकर रस्त्यावरील डिलक्स वाईन्स शाॅप दुकानाचा मालक दारू विक्री करताना परवाना देतानाच्या अटीशर्तींचे पालन करत नाही. या दुकानाच्या परिसरात ग्राहक उघड्यावर दारू पिऊन कचरा करतात. सार्वजनिक स्वच्छतेचा भंग डिलक्स दुकानाचा मालक करत होता. साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी डिलक्स दारू दुकान बंद करण्याची नोटीस बजावली आहे. उत्पादन शुल्क विभागाला पत्र लिहून डिलक्स दुकानाचा दारू विक्रीचा परवाना रद्द करण्याचे कळविले आहे.

देवीचापाडा अड्डा बंद

देवीचापाडा येथे हनुमान मंदिर शेजारील भोईर सदनला लागून मच्छिंद्र चिमण पाटील उर्फ मच्या हा मागील तीन वर्षापासून घराच्या मोकळ्या जागेत विदेशी दारू बेकायदा विक्री करत होता. या अड्डयावर रास्त दरात विदेशी दारू मिळत असल्याने ग्राहकांची दिवस, रात्र गर्दी येथे असायची. परिसरातील रहिवासी दारूड्यांच्या त्रासाने हैराण होते. विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार, पोलीस उपनिरीक्षक दीपविजय भवर यांच्या पथकाने मच्छिद्रच्या अड्डयावर छापा टाकून दारू अड्डा उध्वस्त केला आणि दारूविक्रेत्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.

ग्राहक सेवेचे कोणतेही नियम न पाळता डिलक्स वाईन्स शाॅपचा मालक दारू विक्री करतो. दुकान परिसरात अस्वच्छता, दारू बाटल्या पडल्या आहेत. त्यामुळे हे दुकान बंदची नोटीस आणि उत्पादन शुल्क विभागाला परवाना रद्द करावा असे कळविले आहे. भारत पवार, साहाय्यक आयुक्त, फ प्रभाग.