डोंबिवली– पूर्वेतील महापालिकेच्या विकास आराखड्यातील रस्त्यांमध्ये उभारण्यात आलेल्या बेकायदा इमारती, चाळींच्या बांधकामांवर शुक्रवारी ग प्रभागाच्या पथकाने कारवाई केली. सर्व प्रभागांमध्ये बेकायदा बांधकामांवर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू असताना ग प्रभागात कारवाई होत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता होती.
हेही वाचा >>> वाढत्या तापमानात आता भारनियमनाचा झटका; बदलापूर, अंबरनाथमध्ये सुरू होणार भार नियमन
आयरे भागातील आशादेवी मंदिर ते बालाजी गार्डन संकुल परिसरातील बेकायदा इमारती, रस्ते विकास आराखड्यातील चाळींवर कारवाई करण्यात आली. मागील दोन महिन्यांपासून आयरे भागातील बेकायदा बांधकामांवर अधिकाऱ्यांकडून कारवाई होत नसल्याने ग प्रभाग कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा निर्णय आणि इशारा या भागातील जागरुक रहिवासी तानाजी केणे यांनी अधिकाऱ्यांना दिला होता.
शुक्रवारी सकाळी ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजय साबळे यांनी आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या आदेशावरुन रस्ते विकास आराखड्यातील बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरू केली. या कारवाईमुळे या भागातील रस्त्यांचा विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रामनगर पोलीसांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. साहाय्यक आयुक्त साबळे यांनी अचानक आज सकाळी तोडकामाला सुरुवात करताच भूमाफियांची पळापळ झाली.
हेही वाचा >>> कल्याणमध्ये भाजप जिल्हा उपाध्यक्षांच्या कार्यालयावर दगडफेक ; मोटारीचे नुकसान
मोठागाव-माणकोली, कोपर भागातून येणारा वळण रस्ता आयरे, भोपर भागातून काटई मार्गे हेदुटणे भागात जाणार आहे. या पट्ट्यातील दीड किलोमीटरचा भाग आयरे प्रभागात येतो. ही बांधकामे काढल्याने वळण रस्त्याचे येणाऱ्या काळातील सर्व्हेक्षण, मोजणी आणि भूसंपादनाचा मार्ग मोकळा होणार आहे, असे तक्रारदार तानाजी केणे यांनी सांगितले.