गेल्या दोन महिन्यांपासून कल्याण-डोंबिवली शहरातील अनेक महत्त्वाचे रस्ते, गल्ल्या तोडफोड करून पालिकेकडून मोकळ्या केल्या जात आहेत. परंतु एकही राजकीय नेता, लोकप्रतिनिधी कारवाईत अडथळा आणण्यास पुढे सरसावत नाही. गजबजाट, बजबजपुरीला शहरातील लोक कंटाळले आहेत. परंतु बोलण्याची सोय नसल्याने, आहे ते सगळे सहन केले जात आहे. या पाश्र्वभूमीवर आयुक्त रवींद्रन यांनी सामान्यांच्या मनातील गरजा ओळखून नागरी सुविधा देण्यास सुरुवात केल्याने त्याचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे.
कोणतेही राजकीय दडपण नसलेला सक्षम नोकरशहा अतिशय तडफेने शहर विकासाचे कसे निर्णय घेऊ शकतो, हे शनिवारी डोंबिवलीतील धडक कारवाईमुळे पुन्हा एकदा दिसून आले. डोंबिवली पश्चिमेत गेल्या वीस ते तीस वर्षांहून अधिक काळ रेल्वे स्थानकाला खेटून उभ्या असलेल्या ९५ टपऱ्या या कारवाईत जमीनदोस्त करण्यात आल्या. विष्णूनगर पोलीस ठाणे आणि पश्चिमेतील रेल्वे फलाट क्रमांक एकला खेटून या टपऱ्या रस्ता अडवूनच उभ्या होत्या. या टपऱ्या म्हणजे राजकीय आणि सामाजिक सेवेच्या नावाखाली कार्य करणाऱ्या काही मंडळींची ‘दुकाने’ होती. या टपऱ्या पालिकेच्या विकास आराखडय़ातील ऐंशी फुटाच्या रस्त्याला अडथळा ठरत होत्या. अनेकदा या टपऱ्या तोडण्याचा पालिका, रेल्वे प्रशासनाने प्रयत्न केला. पण नेहमीच टपरीमालकांच्या दबावाखाली असलेल्या तत्कालीन पालिका अधिकाऱ्यांनी करदात्या सामान्यांपेक्षा टपरीमालकांची मर्जी सांभाळण्यात धन्यता मानली. सहा बाय सहा फुटाची टपरी इंच इंच वाढून हळूहळू रस्त्याला अधिकच अडथळा ठरू लागली. गेल्या वीस वर्षांत एकाही पालिका आयुक्ताला आक्रमक भूमिका घेऊन या टपऱ्या तोडाव्यात असे वाटले नाही. विद्यमान आयुक्त ई. रवींद्रन यांनी सामान्यांना फार काही विकासाची प्रलोभने अर्थसंकल्पात दाखविली नाहीत, पण किमान सामान्यांना चांगले वाहतूक कोंडीमुक्त रस्ते तर आपण देऊ शकतो असा विचार करून, विकास आराखडय़ातील रस्ते रुंदीकरणाचा एक कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे.
आयुक्तांच्या या भूमिकेचे शहरवासीयांनी स्वागत केले आहे. कल्याणमधील शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक हा वर्दळीचा बाजारपेठेतील रस्ता रुंदीकरण होईल, असे कधी कल्याणमधील सामान्यांना वाटले नव्हते, पण या मुख्य वर्दळीच्या कोंडीने गजबजलेल्या, अतिक्रमणाने वेढलेल्या रस्त्यावरील जुनी, नवीन सगळी अतिक्रमणे पालिकेने हटविली. या वेळी राज्य सरकारमधील एका मंत्र्याच्या ओळखीच्या व्यापाऱ्याचे दुकान तुटले. त्यामुळे आयुक्त रवींद्रन यांच्या विरुद्ध मंत्रालय स्तरावर बरीच खळखळ झाली. आयुक्तांची बदली होत आहे, हे कल्याण-डोंबिवलीतील रहिवाशांना कळताच, मुख्यमंत्र्यांच्या ई-मेलवर रहिवाशांनी आयुक्तांची बदली करू नये म्हणून आपल्या भावना व्यक्त केल्या. आयुक्तांच्या समर्थनार्थ शहरात जागोजागी स्वाक्षरी मोहिमा राबविण्यात आल्या. या सगळ्या वातावरणामुळे राज्य सरकारला पण लोकांना काय हवे हे समजले.
अनेक वर्षे कल्याण-डोंबिवली म्हणजे आमची जहागिरी, या जहागिरीचे आम्ही वतनदार अशा आविर्भावात वावरणाऱ्या नगरसेवक, आमदारांना अतिक्रमणाची बाजू आता उचलली तर, संतप्त झालेले सर्वसामान्य आपलीच गठडी वळविण्यास मागे-पुढे पाहणार नाहीत, याची जाणीव झाली आहे.
पालिकेच्या याच कारवाईचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे डोंबिवली पश्चिमेत अनेक वर्षांपासून पंडित दीनदयाळ चौक ते महात्मा फुले चौकापर्यंत ९५ टपऱ्या रांगेत रेल्वे फलाट क्रमांक एकला खेटून उभ्या होत्या. डोंबिवली पश्चिम भागाला घातलेला हा टपऱ्या म्हणजे मोठा ‘लक्ष्मीहार’ होता. रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर कोणत्याही नवीन पाहुण्याचे या टपऱ्या, त्यांच्यासमोरील रिक्षांच्या दोन ते तीन रांगा आणि मग त्यामुळे झालेली वाहतूक कोंडी स्वागत करायची. पालिका आयुक्तांनी या टपऱ्यांवरच घाव घालून प्रवाशांची सुटका केली आहे. मात्र आता या भागात कोणतीही राजकीय टपरी उभी राहणार नाही यादृष्टीने पालिकेने सावध राहणे आवश्यक आहे. अनेक वर्षांची हक्काची जागा गेल्याने अनेकांना पोटदुखी आणि कायमस्वरूपी दुकान बंद झाल्याने काहींना त्रास होणार आहे. त्यामुळे अशी मंडळी हट्टाने टपऱ्यांच्या जागेवर पालिकेची साफसफाई झाली की, आपले दुकान थाटण्याची शक्यता आहे. अशांवर तातडीने कारवाईचा बडगा उभारण्याची तयारी पालिकेने ठेवणे आवश्यक आहे.
या सुविधांची गरज
’ ९१ टपऱ्या तोडल्यामुळे (चार टपऱ्यांवर कारवाई करण्यास न्यायालयाची स्थगिती) दीनदयाळ चौक ते फुले चौकादरम्यान सुमारे दोनशे ते तीनशे मीटर लांबीचा आणि दहा फूट रुंदीचा पट्टा पालिका, रेल्वेला नागरी सुविधा देण्यासाठी उपलब्ध झाला आहे. पहिले म्हणजे या पट्टय़ाचे योग्य नियोजन पालिकेने करावे.
’ या प्रशस्त जागेत रेल्वे स्थानकाला खेटून रिक्षाचालकांची फक्त एकच रांग असेल यादृष्टीने पालिका, वाहतूक विभाग आणि रिक्षा संघटनांनी प्रयत्न करावेत.
’ फुले चौकाजवळील स्वच्छतागृहाजवळून पालिका परिवहन उपक्रमाने गरिबाचावाडा परिसरात जाणारी एक मिनी बस नियमित या भागातून सोडावी.
’ दुसरी मिनी बस दीनदयाळ चौकातून रेतीबंदर, आनंदनगर, देवीचौक भागात प्रवासी वाहतूक करण्यासाठी सोडावी. पालिकेने ही बससेवा नियमित उपलब्ध करून दिली तर बसने प्रवास करू इच्छिणारे प्रवासी आरामात बसने इच्छितस्थळी निघून जातील.
’ दीनदयाळ चौक ते विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या दरम्यान तीन ते चार रांगांमध्ये रिक्षा उभ्या करून रिक्षाचालक व्यवसाय करतात. त्यांना फक्त विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या कोपऱ्यावरील वाहनतळावर एका रांगेत रिक्षा उभी करण्याची मुभा देण्यात यावी. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल.
’ गेल्या चार वर्षांपासून रेल्वे फलाटांवरून बाहेर काढण्यात आलेला प्रवासी जिना टपऱ्यांचा अडथळा असल्याने सुरू करण्यात येत नव्हता. आता रेल्वेने टपऱ्यांच्या जागांवरील पालिकेची गटारे व अन्य कामे पूर्ण झाल्यावर हा जिना तातडीने खुला करावा.