कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत राहणाऱ्या माजी सैनिकांना ते राहत असलेल्या मालमत्तेला करात सवलत देण्याचा ठराव सर्वसाधारण सभेने मंजूर केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून माजी सैनिकांना मालमत्ता करात सवलत देण्याच्या ठरावाची अंमलबजावणी प्रशासनाकडून केली जात नव्हती. माजी आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी ही सवलत देण्यात खोडा घातला होता.
माजी सैनिकांना मालमत्ता करात सूट देण्यासाठी सर्वसाधारण सभेने दोन वर्षांपूर्वी दोन ठराव केले आहेत. देशाची सेवा करणाऱ्या सैनिकांना मालमत्ता कर सूट देण्याचे प्रस्ताव पुणे, नवी मुंबई व इतर पालिकांनी मंजूर करून करसवलतीच्या सुविधा माजी सैनिकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. कल्याण डोंबिवली पालिकेने माजी सैनिकांना २७.५ टक्के मालमत्ता करात सूट देण्यासाठी दोन वेळा ठराव करूनही माजी आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी फुटकळ कारणे देऊन या प्रस्तावाची अंमलबजावणी केली नाही, अशी टीका नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांनी केली. पाणीसंचय करणाऱ्या सोसायटय़ांना मालमत्ता करात एक ते दोन टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव रामनाथ सोनवणे यांनी रोखून धरल्याची टीका प्रकाश पेणकर यांनी केली. प्रशासनाचा चालढकलपणा रहिवाशांना जाचक ठरतो. त्यामुळे नवीन करप्रणालीच्या मागे लागू नका, असे ते म्हणाले. महापौर कल्याणी पाटील यांनी माजी सैनिकांना तात्काळ मालमत्ता करात सूट देण्याचा प्रस्ताव मांडून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. २७ टक्के सूट मिळण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.