कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेतील अनेक वर्ष एकाच प्रभागात ठाण मांडून बसलेल्या दहा प्रभागातील फेरीवाला हटाव, अतिक्रमण नियंत्रण पथकातील १३४ कामगारांच्या बदल्या अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी केल्या आहेत. हे बदली कामगार प्रभागातील अनुभव कर्मचारी असल्याने प्रभागातील साहाय्यक आयुक्त त्यांना मुक्त करण्यास किंवा नव्याने येणारे बदली कामगार हजर करून घेण्यास टाळाटाळ करत आहेत.
बदली करूनही अनेक कामगार आपल्या बदलीच्या ठिकाणी साहाय्यक आयुक्तांच्या नाकर्तेपणामुळे हजर होत नसल्याची बाब अतिरिक्त आयुक्त गायकवाड, उपायुक्त अवधूत तावडे यांच्या निदर्शनास आली. उपायुक्त तावडे यांनी दहा प्रभागातील साहाय्यक आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजावून आपल्या प्रभागातील बदली झालेल्या फेरीवाला हटाव, अतिक्रमण नियंत्रण पथकातील कामगारांना तातडीने मुक्त करण्याचे आणि बदली होऊन प्रभागात दाखल होणाऱ्या कामगारांना तातडीने हजर करून घेण्याचे आदेश दिले आहेत.
आयुक्तांनी कामगारांचे बदली आदेश काढले की बदलीच्या ठिकाणी हजर व्हायचे नाही. राजकीय दबाव आणून बदली रद्द करून घेण्याची कल्याण डोंबिवली पालिकेतील अनेक वर्षाची प्रथा आहे. अनेक कामगार वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी फेरीवाला, अतिक्रमण नियंत्रण पथकात आहेत. त्यामुळे त्यांचे फेरीवाल्यांशी स्नेहाचे संबंध आहेत. प्रभागातील बेकायदा बांधकामे करणाऱ्या भूमाफियांना पाठीशी घालण्यात, प्रभागात होणाऱ्या कारवाईची माहिती माफियांना देण्यात काही कामगार महत्वाची भूमिका बजावतात. काही कामगार साहाय्यक आयुक्तांचे खास म्हणून प्रभागात मिरवतात.
निवडणुकांच्या कामांमध्ये कामगार व्यस्त आहेत. फेरीवाला हटविणे या मोहिमा वेळवेळच्या करायचा आहेत यासाठी साहाय्यक आयुक्तांनी बदली झालेल्या कामगारांना प्रभागातून मुक्त करण्यास विलंब लावला. काही कामगार बदलीच्या ठिकाणी हजर होण्यास गेले. तेथे त्यांना साहाय्यक आयुक्तांनी हजर करून घेतले नाही. ही बाब अतिरिक्त आयुक्तांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी उपायुक्त तावडे यांना अशाप्रकारे बदल्या रोखण्याची भूमिका घेणाऱ्या साहाय्यक आयुक्तांवर कारवाई करण्याची सूचना केली.
या आदेशाप्रमाणे उपायुक्त तावडे यांनी साहाय्यक आयुक्तांनी बदली कामगारांना तातडीने मुक्त करावे. बदली होऊन आलेल्या कामगारांना हजर करून घ्यावे. या कामात टाळाटाळ करणारे साहाय्यक आयुक्त वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान करत आहेत. ही बाब कार्यालयीन शिस्तीचा भंग करणारी आहे. आपल्या कर्तव्यात कसूर केली म्हणून आपल्या विरुध्द शिस्तभंगाची कारवाई का करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस उपायुक्तांनी दहा प्रभाग अधिकाऱ्यांना पाठविली आहे.
शेलार यांची पाठराखण
अनेक वर्ष एकाच प्रभागात ठाण मांडून असलेल्या कामगारांच्या बदल्या प्रशासनाने केल्या. या बदल्यांमध्ये पालिका मुख्यालयातील मध्यवर्ति फेरीवाला हटाव पथकातील राजू शेलार या कामगाराचीही प्रशासनाने बदली करावी, अशी जोरदार मागणी बदली कामगार करत आहेत. ते उपायुक्तांच्या दालनात कार्यरत आहेत म्हणून त्यांची बदली करण्यात आली नाही का, असे प्रश्न कामगारांकडून केले जात आहे.
बदली झालेल्या कामगारांनी तातडीने त्यांच्या प्रभागात हजर व्हायचे आहे. साहाय्यक आयुक्तांनी या कामगारांना मुक्त किंवा हजर करून घेतले नाहीतर त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित केली जाईल. हर्षल गायकवाड अतिरिक्त आयुक्त,