एमआयडीसी परिसराला अवकळा; अभ्यासक, विद्यार्थी दरुगधीने त्रस्त
विख्यात शिल्पकार सदाशिव ऊर्फ भाऊ साठे यांच्या डोंबिवली एमआयडीसीतील ‘शिल्पालय’ या वास्तुभोवती कल्याण-डोंबिवली पालिकेने २७ गावांमधील कचरा आणून टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शिल्पालयातील कर्मचारी, शिल्पालयाला भेट देणारे शालेय विद्यार्थी, अभ्यासक यांना या कचऱ्याच्या दरुगधीला सामोरे जावे लागत आहे. महापालिकेच्या या गोंधळी कारभाराबद्दल शिल्पकार भाऊ साठे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
२७ गावे ग्रामपंचायतीमध्ये असताना एमआयडीसीसह, गावांच्या परिसरातील कचरा अस्तित्व शाळेजवळील मोकळ्या भूखंडावर टाकण्यात येत होता. या दरुगधीविषयी या भागातील संस्था, उद्योजकांनी विविध स्तरांवर तक्रारी केल्यानंतर ही कचराभूमी बंद करण्यात आली. गेल्या वर्षांपासून एमआयडीसीसह, २७ गावे कल्याण-डोंबिवली पालिकेत समाविष्ट करण्यात आली आहेत. या भागातील कचरा सुरुवातीला कोळे, भाल, एमआयडीसीतील मोकळ्या जागांवर टाकण्यात येत होता. गावे पालिकेत समाविष्ट होताच, ग्रामस्थांनी आपल्या गावांच्या हद्दीत कचरा टाकण्यास पालिकेला विरोध केला.
काही दिवस पालिकेने गावांमधील कचरा आधारवाडी क्षेपणभूमीवर वाहून नेला. कचरा वाहतुकीत वेळ जात असल्याने आरोग्य अधिकाऱ्यांनी ऑक्टोबरपासून एमआयडीसी, गावांमधील कचरा शिल्पालयासमोरील मोकळ्या जागेत आणून टाकण्यास सुरुवात केली आहे. या ठिकाणी इमारतीचा पाया खणताना निघणारी माती, मलबा आणून टाकण्यात येऊ लागला. त्यामुळे शिल्पालय परिसराला अवकळा प्राप्त झाली आहे.
पावसात भिजलेला ओला कचरा आधारवाडी येथे वाहून नेणे पालिका कर्मचाऱ्यांना शक्य होत नाही. आधारवाडी क्षेपणभूमीवर पावसाने मोठय़ा प्रमाणात चिखल झाला आहे. क्षेपणभूमीच्या मध्यभागी कचरा नेऊन टाकणे वाहनचालकांना शक्य होत नाही. त्यामुळे आरोग्य विभागातील आरोग्य निरीक्षक, मुकादम हे स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन, कचरा आधारवाडी येथे वाहून नेण्यापेक्षा एमआयडीसीतील शिल्पालयासमोर बंद पडलेल्या कंपनीसमोर टाकत आहेत.
आपण ज्या ठिकाणी कचरा टाकतो, त्याच्यासमोर जगप्रसिद्ध शिल्पकार भाऊ साठे यांनी उभारलेले शिल्पालय आहे. याचे भान आरोग्य कर्मचाऱ्यांना नाही, याबाबत कलाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
सुशोभीकरणासाठी प्रयत्न
भाऊंच्या शिल्पकलेतील योगदानाला सलाम म्हणून शिल्पालयाच्या परिसराचे रुपडे बदलण्यासाठी साठे प्रतिष्ठानचे प्रयत्न सुरू आहेत. या भागातील रस्त्यांवर वृक्षारोपण करून परिसर हिरवागार करण्यात येणार आहे. शिल्पालय वास्तू असलेल्या रस्त्याला भाऊ साठे यांचे नाव देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. शिल्पालय पर्यटनाचे केंद्र व्हावे. कला महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रतिष्ठानच्या सहकार्याने शिल्पालय परिसर विकसित करण्याची योजना आखत आहे. शिल्पालय ते कल्याण-डोंबिवली पालिकेने बससेवा सुरू करावी म्हणून प्रयत्न करण्यात येणार आहेत. शिल्पालय परिसर विकासाच्या कागदोपत्री योजना सुरू असताना, पालिकेने शिल्पालयाभोवतीच कचराभूमी विकसित करण्याच्या हालचाली सुरू केल्याने शिल्पालय विकसित केले तरी, कोणी या भागात पाऊल ठेवील का? कचऱ्याची दरुगधीमुळे शिल्पालयात कोणी कर्मचारी, कारागीर टिकत नाही.
-श्रीरंग साठे, शिल्पालय विश्वस्त
दोन महिन्यांत कचरा केंद्र बंद
२७ गावांमधील ग्रामस्थ गावांच्या परिसरात कोठेही कचरा टाकून देत नाहीत. त्यामुळे गावांमधील सगळा कचरा टाकण्याची मोठी अडचण झाली आहे. ग्रामपंचायतीच्या घंटागाडय़ा, ट्रॅक्टर थेट आधारवाडी येथे नेणे शक्य होत नाही. त्यामुळे एमआयडीसी, २७ गावांमधील कचरा शिल्पालय परिसरात टाकण्यात येतो. हा कचरा दुपारच्या वेळेत डम्परमधून उचलण्यात येतो. येत्या दोन महिन्यांत १६ मोठय़ा कचरावाहू गाडय़ा दाखल होणार आहेत. या गाडय़ा एमआयडीसी, २७ गावांमधील कचरा थेट आधारवाडी येथे घेऊन जातील. त्यामुळे सध्या जेथे कचरा गोळा केला जातो. तेथे कचरा टाकणे बंद करण्यात येईल.
– विलास जोशी, साहाय्यक आरोग्य अधिकारी, कडोंमपा.
पालिकेचे दुर्लक्ष
शिल्पालयात भाऊंनी गेल्या साठ वर्षांत शिल्पकलेसाठी जे योगदान दिले आहे. तो पट शिल्पालयात उभारण्यात आला आहे. शिल्पालयात देखणे म्युझियम आहे. देशोदेशी उभारलेले पुतळ्यांचे नमुने, पुतळ्यांचे साचे, आर्ट गॅलरीत आहेत. आजूबाजूच्या घाणीमुळे शिल्पालयात माश्यांचे थवेच्या थवे येत आहेत. रात्रभर कचरा कुजल्यानंतर दिवसभर या भागात असह्य़ दरुगधी पसरते, असे शिल्पालयाचे श्रीरंग साठे यांनी सांगितले. शिल्पालय पाहण्यासाठी विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक, दर्शक नियमित येतात. काही परदेशी पर्यटकही आवर्जून शिल्पालयाला भेट देतात. त्यांनाही या घाणीतून मार्ग काढत शिल्पालयापर्यंत यावे लागते. गेल्या काही महिन्यांपासून शिल्पालयाचे संचालक श्रीरंग साठे करीत असलेल्या तक्रारींकडे आयुक्तांसह एकही पालिका अधिकारी लक्ष देत नाही. ‘आम्हाला कचरा टाकण्यासाठी सर्व ठिकाणाहून विरोध होत आहे. मग आम्ही कचरा ठेवायचा कोठे, असा प्रश्न उपस्थित करीत येथे जमा होणार कचरा दुपापर्यंत उचलण्यात येईल, असे आश्वासन दिले जाते परंतु त्याची अंमलबजावणी केली जात नाही, अशी खंत साठे यांनी व्यक्त केली.