एमआयडीसी परिसराला अवकळा; अभ्यासक, विद्यार्थी दरुगधीने त्रस्त
विख्यात शिल्पकार सदाशिव ऊर्फ भाऊ साठे यांच्या डोंबिवली एमआयडीसीतील ‘शिल्पालय’ या वास्तुभोवती कल्याण-डोंबिवली पालिकेने २७ गावांमधील कचरा आणून टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शिल्पालयातील कर्मचारी, शिल्पालयाला भेट देणारे शालेय विद्यार्थी, अभ्यासक यांना या कचऱ्याच्या दरुगधीला सामोरे जावे लागत आहे. महापालिकेच्या या गोंधळी कारभाराबद्दल शिल्पकार भाऊ साठे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
२७ गावे ग्रामपंचायतीमध्ये असताना एमआयडीसीसह, गावांच्या परिसरातील कचरा अस्तित्व शाळेजवळील मोकळ्या भूखंडावर टाकण्यात येत होता. या दरुगधीविषयी या भागातील संस्था, उद्योजकांनी विविध स्तरांवर तक्रारी केल्यानंतर ही कचराभूमी बंद करण्यात आली. गेल्या वर्षांपासून एमआयडीसीसह, २७ गावे कल्याण-डोंबिवली पालिकेत समाविष्ट करण्यात आली आहेत. या भागातील कचरा सुरुवातीला कोळे, भाल, एमआयडीसीतील मोकळ्या जागांवर टाकण्यात येत होता. गावे पालिकेत समाविष्ट होताच, ग्रामस्थांनी आपल्या गावांच्या हद्दीत कचरा टाकण्यास पालिकेला विरोध केला.
काही दिवस पालिकेने गावांमधील कचरा आधारवाडी क्षेपणभूमीवर वाहून नेला. कचरा वाहतुकीत वेळ जात असल्याने आरोग्य अधिकाऱ्यांनी ऑक्टोबरपासून एमआयडीसी, गावांमधील कचरा शिल्पालयासमोरील मोकळ्या जागेत आणून टाकण्यास सुरुवात केली आहे. या ठिकाणी इमारतीचा पाया खणताना निघणारी माती, मलबा आणून टाकण्यात येऊ लागला. त्यामुळे शिल्पालय परिसराला अवकळा प्राप्त झाली आहे.
पावसात भिजलेला ओला कचरा आधारवाडी येथे वाहून नेणे पालिका कर्मचाऱ्यांना शक्य होत नाही. आधारवाडी क्षेपणभूमीवर पावसाने मोठय़ा प्रमाणात चिखल झाला आहे. क्षेपणभूमीच्या मध्यभागी कचरा नेऊन टाकणे वाहनचालकांना शक्य होत नाही. त्यामुळे आरोग्य विभागातील आरोग्य निरीक्षक, मुकादम हे स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन, कचरा आधारवाडी येथे वाहून नेण्यापेक्षा एमआयडीसीतील शिल्पालयासमोर बंद पडलेल्या कंपनीसमोर टाकत आहेत.
आपण ज्या ठिकाणी कचरा टाकतो, त्याच्यासमोर जगप्रसिद्ध शिल्पकार भाऊ साठे यांनी उभारलेले शिल्पालय आहे. याचे भान आरोग्य कर्मचाऱ्यांना नाही, याबाबत कलाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा