कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेतील कर्मचारी, अधिकाऱी यांनी पालिकेत स्वतः किंवा आपले कुटुंबीय, खासगी व्यक्तींच्या माध्यमांमधून दिवाळी भेटीचा स्वीकार करू नये, असे पत्रक आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी मंगळवारी काढल्याने वर्षानुवर्षे दिवाळीच्या काळात आपल्या खासगी वाहनांच्या डिकी, वाहन दिवाळी भेट वस्तुंनी भरुन घेऊन जाणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पालिकेच्या २५ वर्षात प्रथमच अशाप्रकारचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : साईबाबा प्रकरणात कुणाचे चुकले? काय चुकले?

कल्याण डोंबिवली पालिकेचा कारभार लोकाभिमुख, प्रभावीपणे राबविण्यासाठी पालिकेतील कर्मचारी, अधिकारी यांनी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. कामातील पारदर्शकपणा, सातत्य कायम ठेवण्यासाठी कोणाही पालिका अधिकारी, कर्मचाऱ्याने कोणत्याही व्यक्तींकडून दिवाळी भेट वस्तू स्वीकारू नये. अशाप्रकारची भेट वस्तू कर्मचारी, अधिकाऱ्याने स्वतः , आपले कुटुंबीय किंवा खासगी व्यक्तींमार्फत स्वीकारण्याचा प्रयत्न केला तर संबंधितांवर महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ मधील कलम १२ नुसार कारवाई केली जाईल. तसेच संबंधिता विरुध्द शिस्तभंगाची कारवाई सुरू केली जाईल, असा इशारा आयुक्त डाॅ. दांगडे यांनी दिला आहे.

हेही वाचा : बदलापूर : बारवीमधील उप कार्यकारी अभियंत्याला ५० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक

दिवाळीच्या तोंडावर आयुक्तांनी हे पत्रक काढल्याने वर्षानुवर्ष दिवाळीच्या तोंडावर आपली खासगी वाहने दिवाळी भेटीने भरुन नेणाऱ्या अधिकाऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे. बांधकाम, नगररचना, आयुक्त कार्यालय ही भेटीची आणि वर्दळीची ठिकाणे असायची.कोणीही व्यक्ती भेट वस्तू घेऊन पालिकेत येत असेल तर सुरक्षा विभागाने त्यांना प्रवेशव्दारावर रोखून धरावे. त्यांना कार्यालयात मज्जाव करावा, असे आदेश आयुक्तांनी सुरक्षा विभागाला दिले आहेत. दिवाळी सण सुरू झाल्यानंतर वर्षानुवर्ष पालिकेशी संबंधित ठेकेदार, विकासक, वास्तुविशारद, हितचिंतक पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या दिवसात विविध प्रकारच्या भेट वस्तू देतात. यामुळे पालिका कर्मचारी, अधिकारी आपल्या कर्तव्यापासून विचलित होऊ शकतो. हा विचार करुन आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना आपल्या लोकाभिमुख कर्तव्याची जाणीव या पत्रातून करून दिली आहे.

हेही वाचा : डोंबिवली : ठाकुर्लीत मंजुनाथ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला टोळक्याची बेदम मारहाण

अशाप्रकारच्या भेटवस्तू स्वीकारण्यासाठी यापूर्वी दिवाळीच्या काळात पालिका कार्यालय रात्री आठ ते नऊ वाजेपर्यंत उघडे असायचे. विकासक, ठेकेदार आपली कामे उरकून पालिकेत येत असल्याने त्यांच्या सोयीसाठी ही तजवीज केली जात होती. आयुक्त डाॅ. दांगेड यांनी प्रथमच या प्रथेवर बंधन आणले आहे. काही वर्षापूर्वी ठाणे पोलीस आयुक्तालयातील कर्तव्यदक्ष सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायणन यांनी आपल्या दालनाच्या प्रवेशद्वारावर कोणी दिवाळीभेट वस्तू घेऊन येऊ नये ती स्वीकारली जाणार नाही अशा प्रकारचा फलक लावला होता. हा फलक त्यावेळी खूप चर्चेला आला होता.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kdmc employees prohibition on accepting diwali gifts commissioner dr bhausaheb dangde tmb 01