डोंबिवली परिसरातील गावांमधील शेतांमध्ये पिकवलेला ताजा भाजीपाला घेऊन कल्याण, डोंबिवली शहरात विक्रीसाठी आणणाऱ्या विक्रेत्यांना महापालिकेचा ‘जिझिया’ कर भरावा लागत आहे. शहरातील पदपथ अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांकडे डोळेझाक करणारे महापालिकेचे स्थानिक प्रभाग अधिकारी गावठी भाज्यांच्या विक्रीसाठी आलेल्या ग्रामस्थांकडून दररोज प्रत्येकी ११ रुपये वसूल करतात, अशी माहिती पुढे आली आहे. बरेच ग्रामीण विक्रेते ताजी भाजी घेऊन कल्याण, डोंबिवली शहरात येत असतात. अशांना ११ रुपयांचा दंड आकारून त्यांना पावतीही दिली जाते.
डोंबिवली परिसरातील भाल, वसार, मलंगगड, पिंपळास, माणकोली, तळोजा यांसारख्या गावांमधील ग्रामस्थ घराजवळील शेतांमध्ये मुळा, पालक, कोथिंबीर, माठ, घेवडा, तोंडली अशा भाज्यांची लागवड करतात.
कोणत्याही खतांचा वापर न करता पिकवलेल्या या ताज्या भाज्यांना मोठी मागणी असते. एका टोपलीत दहा ते पंधरा मुळा, माठाच्या जुडय़ा, एक ते दोन किलो घेवडा, तोंडली अशा गावठी भाज्या बाजारभावापेक्षा स्वस्त दराने विक्रीसाठी आणल्या जातात. त्यामुळे ही गावठी भाजी खरेदी करण्यासाठी खरेदीदारांची झुंबड उडाल्याचे चित्र दिसते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विक्रेत्यांची नाराजी
गावठी भाज्यांच्या विक्रेत्या महापालिकेच्या रस्त्यांच्या कडेला अथवा पदपथांवर बसत नाहीत. वसाहतींमध्ये जाऊन भाज्यांची विक्री करण्याकडे त्यांचा कल असतो, मात्र पदपथ, रस्ते अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांकडे डोळेझाक करणारे महापालिकेचे अधिकारी दिवसातून तास- दोन तासांसाठी शहरात आलेल्या या गावठी भाजी विक्रेत्यांवर कारवाई करताना दिसतात. या विक्रेत्यांकडून दररोज ११ रुपयांची पावती फाडण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

बडय़ा फेरीवाल्यांची ‘बडदास्त’
रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांविरोधात कधीही आक्रमकपणे कारवाई होत नसताना गावठी भाज्या विकणाऱ्या विरोधात मोहीम कशी राबवली जाते, असा सवाल आता उपस्थित होत आहे. रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांकडून दररोज ११ रुपये वसूल केले जातात. या ११ रुपयांच्या पावतीमागे दरमहा सुमारे दोन ते तीन लाखांचा दौलतजादा केला जातो, अशी चर्चा आहे. डोंबिवली पूर्वेतील फडके रस्ता, नेहरू रस्ता, राजाजी रस्ता, उर्सेकर वाडी भागात बाजार शुल्क वसुली केली जाते. बाजार शुल्क वसुलीसाठी पालिकेने खासगी ठेकेदाराला सुमारे सव्वा कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. कल्याणमधील रेल्वे स्थानक परिसर, डोंबिवलीतील नेहरू रस्ता, बाजीप्रभू चौक, चिमणी गल्ली, उर्सेकरवाडी, मानपाडा रस्ता, कामत मेडिकल पदपथ, रॉथ, राजाजी रस्त्यावर फेरीवाल्यांचा विळखा कायम असल्याचे दृश्य आहे.