कल्याण– रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इरशाळवाडी येथील भूस्खलन घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सुरक्षिततेचा उपाय म्हणून कल्याण डोंबिवली पालिकेने कल्याण रेल्वे स्थानकाजवळील पत्रीपूल येथील कचोरे, नेतिवली टेकडीवर रहिवास करणाऱ्या १४० कुटुंबांना स्थलांतराच्या नोटिसा बजावल्या आहेत.
कचोरे टेकडीच्या दरड प्रवण क्षेत्रात राहत असलेल्या १५ कुटुंबाना तातडीने पालिकेच्या कल्याण पूर्वेतील पालिकेच्या हनुमाननगर येथील संक्रमण शिबीर, याच भागातील पालिकेच्या शाळेत दाखल होण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पाच कुटुंबियांनी तातडीने संक्रमण शिबिरात स्थलांतर केले आहे. उर्वरित कुटुंबांना संक्रमण शिबिरात दाखल होण्याच्या सूचना केल्या आहेत, असे जे प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त सविता हिले यांनी सांगितले.
हेही वाचा >>> कल्याण मध्ये टेम्पो चालकाच्या निष्काळजीपणामुळे सहाय्यकाचा मृत्यू
कल्याण-डोंबिवलीतील धारावी म्हणून कचोरे आणि नेतिवली टेकड्या ओळखल्या जातात. नगरसेवकांनी आपल्या एकागठ्ठा मतांची सोय म्हणून या दोन्ही टेकड्यांवर राहत असलेल्या रहिवाशांना पाणी, वीज, स्वच्छतागृह, पायवाटा नागरी सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. नागरी सुविधा असल्याने स्थानिक, मुंबई परिसरातील झोपडीधारक या भागात झोपड्या खरेदी करण्यास प्राधान्य देतात. झोपड्या बांधताना टेकडीचा उताराचा भाग समतल करणे आवश्यक असते. या कामासाठी आणि जोते बांधणीसाठी टेकडीवरील माती, दगड खणून काढली जाते. मागील ३० वर्षात टेकडीवर झोपड्या बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले. सततच्या खोदकामामुळे टेकड्यांचे वरचे भाग, झोपड्या असलेले भाग भुसभुशीत झाले आहेत. पावसाळ्यात डोंगराची जमीन भुसभुशीत होते. पावसाच्या माऱ्यामुळे, झोपड्यांच्या अतिभारामुळे भूस्खलन होते.
मागील वर्षी कचोरे भागात दरड कोसळली होती. यामध्ये एक जण किरकोळ जखमी झाला होता. एका रहिवाशाच्या घरावर दरडीचा ढीग आला होता. एका मोठ्या दगडामुळे माती दगडाला अडून राहिल्याने जीवित हानी टळली होती. तत्कालीन साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी तातडीने कुटुंबियांचे स्थलांतर, ढीग हटविण्याचे काम बचाव पथकाच्या साहाय्याने केले होते.
हेही वाचा >>> डोंबिवली एमआयडीसीतील कंपन्या जलमय, उंचवट्या काँक्रीट रस्त्यांचा उद्योजकांना फटका
इरशाळवाडीच्या दुर्घटनेनंतर कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने सुरक्षिततेचा उपाय म्हणून कचोरे, नेतिवली टेकडीवरील १४० कुटुंबाना तातडीने घरे खाली करुन सुरक्षित ठिकाणी किंवा पालिकेच्या संक्रमण शिबिरात दाखल होण्याच्या सूचना केल्या आहेत.
“कचोरे, नेतिवली टेकडीवरील दरडप्रवण भागात राहत असलेल्या कुटुंबियांना संक्रमण शिबिरात दाखल होण्याच्या सूचना केल्या आहेत. मुसळधार पावसामुळे ही खबरदारी घेण्यात येत आहे. संक्रमण शिबिरात कुटुंबे दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.” सविता हिले- साहाय्यक आयुक्त,जे प्रभाग, कल्याण.