कल्याण-डोंबिवलीत सुरू असलेल्या सिमेंट रस्त्यांच्या निकृष्ट कामांवर चर्चा करण्याच्या नगरसेवकांच्या आग्रहाला महापौर कल्याणी पाटील यांनी न जुमानता ही चर्चाच रद्द केली. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत महापौरांनी बैठक गुंडाळली. दोन्हीही शहरांत रस्त्यांची चाळण झालेली आहे. काही ठिकाणी रस्त्यांचे कॉँक्रिटीकरण सुरू आहे, पण कामांच्या संथ गतीमुळे अर्धे काँक्रिटीकरण झालेले आणि अर्धे रस्ते खड्डेग्रस्त झाले आहेत. त्यामुळे नागरिक आणि वाहनांची दाणादाण उडाली आहे. या कामांवर सध्या जोरदार टीका करण्यात येत आहे.  
शहराचा प्रथम नागरिक या नात्याने महापौरांनी अशा महत्त्वाच्या विषयावर चर्चा का टाळावी, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. निकृष्ट कामाचा अहवाल सभापटलावर ठेवून मगच त्यावर चर्चा केली जाईल, असे सांगून महापौर पाटील यांनी महापालिकेतील अभियंत्यांची एकप्रकारे पाठराखण केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे निवडणुकांच्या तोंडावर सत्ताधारी शिवसेना या मुद्दय़ावरून पुन्हा एकदा अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक शरद गंभीरराव यांनी शहरातील सिमेंट रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची असल्याने सर्वसाधारण सभा तहकूब करावी, अशी मागणी केली होती. साडेचार वर्षांपूर्वी झालेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत शहरातील निकृष्ट रस्त्यांचा मुद्दा मोठय़ा प्रमाणावर चर्चिला गेला होता. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा मुद्दा गांभीर्याने घेत पुढील पाच वर्षांत शहरातील सर्व प्रमुख रस्ते सुस्थितीत आणू, असे आश्वासन दिले होते. प्रत्याक्षात प्रमुख रस्त्यांची कामे अतिशय संथ गतीने सुरू असून काही ठिकाणी रस्ते खोदण्याचे प्रकारही वाढीस लागले आहेत. या रस्ते कामाचे प्रकल्प अभियंता प्रमोद कुलकर्णी, सल्लागार कंपनी या सर्व निकृष्ट कामांना जबाबदार असल्याचा ठपका मध्यंतरी झालेल्या सभेत नगरसेवकांनी ठेवला होता. या वेळी तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी या कामांबाबतचा सविस्तर अहवाल पुढच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात येईल, असे आश्वासन देऊन हा विषय संपवला होता. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत अपक्ष नगरसेवक मोहन उगले यांनी सिमेंट रस्ते अहवालाचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित केला. या विषयावर आम्हाला बोलायचे अशी जोरदार मागणी केली. त्यांच्या मागणीला रवींद्र पाटील, सचिन पोटे, शरद गंभीरराव, श्रीकर चौधरी यांनी पाठिंबा दिला.
‘मुस्कटदाबी सहन करणार नाही’
अहवाल खूप मोठा आहे. त्याचे आपल्याला वाचन करावे लागेल. त्यामुळे पुढच्या बैठकीत हा विषय चर्चेला घेऊ, असे सांगून या विषयावर नगरसेवकांना चर्चा करू देण्यास नकार दिला. दरम्यान, ‘सिमेंट रस्ते हा शिवसेनेच्या निवडणूक जाहीरनाम्यातील विषय आहे. तो विषय झाकण्याचा प्रयत्न महापौर करत आहेत. या विषयावर चर्चा झाली पाहिजे. महापौरांची मुस्कटदाबी सहन केली जाणार नाही. महापौर अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत, म्हणून त्या अहवाल सभागृहात मांडत नाहीत. अभियंता प्रमोद कुलकर्णीना सभागृहात बोलवा,’ अशी जोरदार मागणी मोहन उगले, रवींद्र पाटील, विश्वनाथ राणे, सचिन पोटे यांनी केली.

Story img Loader