कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत सुरू असलेली विकासकामे तसेच इतर प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत. पालिकेची आर्थिक स्थिती चांगली असेल, असे वाटले होते; पण ही परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत, अशी माहिती कल्याण-डोंबिवली पालिकेचे नवनियुक्त आयुक्त एम. जी. आर्दड यांनी बुधवारी पदभार स्वीकारल्यानंतर दिली.
पालिका मुख्यालयात सर्व खातेप्रमुखांची आयुक्त आर्दड यांनी बैठक घेतली. पालिकेचे प्रकल्प, महसुली स्रोत, परिवहन प्रकल्प, सार्वजनिक स्वच्छता, आरोग्यविषयक प्रकल्पांची माहिती घेतली. पाणी, रस्ते, स्वच्छता हे प्रश्न नागरिकांशी थेट संबंधित असतात. त्यामुळे या प्रकल्पांना गती देऊन ते विहित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी दिल्लीच्या धर्तीवर घनकचरा प्रकल्प राबवण्यासाठी प्रयत्न केले जातील. यासाठी र्सवकष आढावा घेण्यात येईल. व्यवस्थापनाला शिस्त लावण्यात येईल, असे बैठकीत स्पष्ट केल्याचे या वेळी ते म्हणाले.
पालिकेत काम करण्याचा आपला पहिलाच अनुभव आहे. कल्याण-डोंबिवलीत नियुक्ती मिळवण्यासाठी आपण शासनाकडे विनंती केली होती. हिंगोली जिल्हा परिषदेत आर्दड यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली होती. ती बदली रद्द करून त्यांना कल्याण-डोंबिवली पालिकेत नियुक्ती देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपशी जवळीक?
आयुक्त आर्दड हे कल्याण, भिवंडीतील काही भाजप लोकप्रतिनिधींचे खास मित्र असल्याचे बोलले जाते. शिवसेना नेते, मंत्री नाराज नकोत म्हणून पालिकेत भारतीय प्रशासकीय सेवेतील आयुक्त न देऊन आणि स्वपक्षीय लोकप्रतिनिधींचे आवडते आयुक्त पालिकेत नियुक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी दोन्ही पक्षांतील नेत्यांना खूश केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kdmc mg ardad
Show comments