महापालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना मतदारांना झुलवणाऱ्या घोषणांची जंत्री टाळणारा अर्थसंकल्प कल्याण-डोंबिवलीचे पालिका आयुक्त मधुकर आर्दड यांनी बुधवारी स्थायी समितीसमोर मांडला. पाणीदरवाढीच्या प्रस्तावामुळे गेल्याच आठवडय़ात हात पोळल्यामुळे सावध होत, कल्याण-डोंबिवलीकरांच्या कोणत्याही करात वाढ होण्याचे आयुक्तांनी टाळले. मात्र, जुन्याच घोषणांचा रतीब आणि रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याचा ‘संकल्प’ या पलीकडे या अर्थसंकल्पात काहीही नाही.  
२०१५-२०१६ या आर्थिक वर्षांसाठी मांडण्यात आलेला हा अर्थसंकल्प १२९२ कोटी रुपयांचा जमा-खर्चाचा शिलकी आहे. यंदाच्या वर्षी शिक्षण मंडळ आणि परिवहन उपक्रमाचे २५३ कोटी ९३ लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. या अर्थसंकल्पात कोणत्याही स्वरूपाची दरवाढ नसली तरी महसुली उत्पन्न  वाढविण्यासाठी नव्या स्रोतांचाही यामध्ये फारसा विचार झालेला नाही. तिजोरीत अक्षरश: खडखडाट असताना उत्पन्न वाढविण्यासाठी नव्या, कल्पक योजनांचा अंतर्भाव या अर्थसंकल्पात का नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, नव्या विकासकामांचे कोणत्याही प्रकल्पांची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. जुने रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. महसुली उत्पन्नाचे मागील दहा वर्षांपासूनचे तेच स्रोत असल्याने उत्पन्नाची बाजू वाढवताना प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे. महसुली लक्ष्याचे आकडे फुगवून अर्थसंकल्प फुगवायचा आणि भव्य आकडय़ांचा अर्थसंकल्प सादर करायचा ही मागील सात ते आठ वर्षांपासून प्रशासनाला लागलेली खोड या वेळीही दिसून आली आहे. गेल्या महिन्यात लेखा विभागाने महसुली उत्पन्नाचे लक्ष्य वाढवून द्या, तरच पुढील अर्थसंकल्पात विकासाची कामे घेता येतील असे सुचवून अर्थसंकल्प फुगवण्याचे संकेत दिले होते.

महसुली उत्पन्नाचा अंदाज
* स्थानिक संस्था कर २२८ कोटी ७० लाख रु.
* मालमत्ता कर २६१ कोटी ९२ लाख रु.
* पाणी देयक वसुली ६० कोटी २० लाख रु.
* विशेष अधिनियम वसुली ९० कोटी

रस्त्यांना प्राधान्य
रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण, पुनर्पृष्ठीकरण, डांबरीकरण यासारख्या कामांसाठी २२२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रस्ते देखभाल दुरुस्तीसाठी २५ कोटी ५० लाख, ठाकुर्ली येथील उड्डाणपुलासाठी १० कोटी ६० लाख, सॅटिस प्रकल्पासाठी २३ कोटी २० लाख, कल्याण पूर्वेतील गीता हरकिसनदास रुग्णालय, डोंबिवलीतील महापालिकेच्या ग्रंथालयासाठी ११ कोटी १५ लाख रुपये, परिवहन उपक्रमातील वित्तीय तूट कमी करण्यासाठी १९ कोटींची तरतूद प्रशासनाने केली आहे.

सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर विकासकामांचा खडखडाट असलेला अर्थसंकल्प प्रशासनाने सादर केल्याने सत्ताधारी पक्ष यामध्ये कोणते बदल सुचवतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका सात महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. गेल्या काही वर्षांत विशेषत: अलीकडच्या काळात पालिकेतील कारभार आणि शहरांचे बकालीकरण यावरून जनतेतील संताप उघडपणे व्यक्त होऊ लागला आहे. या पाश्र्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही घोषणा करण्याचा सत्ताधाऱ्यांचा संकल्प आहे. मात्र, आयुक्तांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात अशा घोषणा नसल्याने आता अर्थसंकल्प मंजूर करताना काय भूमिका घेतील, याकडे लक्ष लागले आहे.

Story img Loader