महापालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना मतदारांना झुलवणाऱ्या घोषणांची जंत्री टाळणारा अर्थसंकल्प कल्याण-डोंबिवलीचे पालिका आयुक्त मधुकर आर्दड यांनी बुधवारी स्थायी समितीसमोर मांडला. पाणीदरवाढीच्या प्रस्तावामुळे गेल्याच आठवडय़ात हात पोळल्यामुळे सावध होत, कल्याण-डोंबिवलीकरांच्या कोणत्याही करात वाढ होण्याचे आयुक्तांनी टाळले. मात्र, जुन्याच घोषणांचा रतीब आणि रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याचा ‘संकल्प’ या पलीकडे या अर्थसंकल्पात काहीही नाही.
२०१५-२०१६ या आर्थिक वर्षांसाठी मांडण्यात आलेला हा अर्थसंकल्प १२९२ कोटी रुपयांचा जमा-खर्चाचा शिलकी आहे. यंदाच्या वर्षी शिक्षण मंडळ आणि परिवहन उपक्रमाचे २५३ कोटी ९३ लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. या अर्थसंकल्पात कोणत्याही स्वरूपाची दरवाढ नसली तरी महसुली उत्पन्न वाढविण्यासाठी नव्या स्रोतांचाही यामध्ये फारसा विचार झालेला नाही. तिजोरीत अक्षरश: खडखडाट असताना उत्पन्न वाढविण्यासाठी नव्या, कल्पक योजनांचा अंतर्भाव या अर्थसंकल्पात का नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, नव्या विकासकामांचे कोणत्याही प्रकल्पांची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. जुने रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. महसुली उत्पन्नाचे मागील दहा वर्षांपासूनचे तेच स्रोत असल्याने उत्पन्नाची बाजू वाढवताना प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे. महसुली लक्ष्याचे आकडे फुगवून अर्थसंकल्प फुगवायचा आणि भव्य आकडय़ांचा अर्थसंकल्प सादर करायचा ही मागील सात ते आठ वर्षांपासून प्रशासनाला लागलेली खोड या वेळीही दिसून आली आहे. गेल्या महिन्यात लेखा विभागाने महसुली उत्पन्नाचे लक्ष्य वाढवून द्या, तरच पुढील अर्थसंकल्पात विकासाची कामे घेता येतील असे सुचवून अर्थसंकल्प फुगवण्याचे संकेत दिले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा