भगवान मंडलिक, लोकसत्ता
कल्याण : ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हानगर, कुळगाव-बदलापूर, अंबरनाथ या शहरांना जोडणारी एकात्मिक बससेवा असावी, अशी कल्पना पुढे आली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेने यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला असून स्वत: मुख्यमंत्री या प्रकल्पासाठी आग्रही असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
पुणे महापालिका परिवहन महामंडळाच्या धर्तीवर विशेष वहन कंपनी (एसपीव्ही) स्थापन करुन वेगाने विस्तारत असलेल्या शहरांसाठी स्वतंत्र्य परिवहन उपक्रम स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, उल्हानगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्ये स्थानिक परिवहन व्यवस्था नसल्याने स्वतंत्र प्राधिकरण उभारण्याविषयी गेल्या काही वर्षांपासून चर्चा सुरु आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद येताच ‘चौथ्या मुंबई’साठी एकात्मिक परिवहन उपक्रमासाठी पुन्हा प्रयत्न सुरू झाले आहेत.
राज्य सरकारने दिलेल्या निर्देशांनंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेने प्रस्ताव तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली या तीन महापालिकांच्या बससेवा आहेत. यापैकी ठाणे आणि नवी मुंबई परिवहन उपक्रमांत ५००पेक्षा अधिक बस असून नवी मुंबई परिवहनने कल्याण, डोंबिवली, बदलापूर, खोपोली या शहरांत आपले जाळे विस्तारले आहे. नव्या प्रस्तावानुसार उपक्रमाच्या बस भिवंडी, बदलापूर, उल्हासनगर, अंबरनाथसह मुंबई महानगर क्षेत्रातील भागांतही प्रवासी वाहतूक करू शकतील. परिवहन उपक्रमांना लागून असलेल्या शहरांच्या हद्दीत प्रवासी वाहतूक करण्यास मुभा एमएमआरडीएने यापूर्वीच दिली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचा निर्णय कल्याण-डोंबिवली महापालिकेसह लगतच्या पालिकांनी घेतला आहे.
विशेष वहन कंपनीचा उद्देश
पालिका हद्दीतील लोकसंख्येप्रमाणे बस वाहतुकीचे नियोजन, कर्मचारी वर्गाचे नियोजन, आगार, थांब्यांसाठी मालमत्तांचा वापर, तोटय़ाची भरपाई आणि नफा झाल्यास त्याचा परिवहन सेवेच्या विकासासाठी वापर आदी मुद्दे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रस्तावात अंतर्भूत आहेत. महानगर परिवहन निगमसाठी विशेष हेतु वहन कंपनीला परवानगी देण्याची मागणी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी शासनाकडे केली आहे.
पूर्वीचे प्रयत्न का फसले?
दोन वर्षांपूर्वी शासनाने मुंबईलगतच्या सर्व महापालिकांकडून एकात्मिक परिवहन सेवेबाबत सूचना मागविल्या होत्या.त्यानुसार भिवंडी, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ पालिकांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेला आपल्या हद्दीत वाहतूक सुरू करण्याचे प्रस्ताव दिले. मात्र नवी मुंबई आणि ठाणे महापालिकांच्या परिवहन उपक्रमांनी एकात्मिक परिवहन व्यवस्थेत सहभागी होण्यास नकार दिल्यामुळे शासनाच्या प्रयत्नांना खीळ बसली.
जिल्ह्यातील प्रवासी हिताचा हा महत्वपूर्ण विषय मार्गी लागण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या समवेत एक बैठक घेतली जाईल. प्रवाशांना तत्पर सेवा मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील.
– रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री