कल्याण डोंबिवली पालिकेच्या ऑनलाइन सुविधा घेताना गेल्या २० दिवसांपासून नागरिकांना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागते. तांत्रिक अडचणी कशा सोडवायच्या याची मुद्देसुद उत्तरे पालिकेच्या संगणक विभाग, नागरी सुविधा केंद्रातून दिली जात नसल्याने नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून पालिकेच्या जुनाट संगणकीकृत (ई गव्हर्नन्स) ऑनलाईन प्रणालीचे उन्नत्तीकरण करण्यात आले आहे.
स्मार्ट सिटी कंपनीने पालिकेच्या ऑनलाइन सुविधेचे अद्ययावत उन्नत्तीकरण केले आहे. उन्नत्तीकरण कामासाठी मागील दोन महिने पालिकेची ऑनलाइन सुविधा संथगतीने तर कधी बंद होती. नवीन सुविधा हाताळण्यास मिळेल म्हणून नागरिकांनी काही दिवस त्रास सहन केला. आता नवीन ऑनलाइन यंत्रणा डोकेफोडीची असल्याने रहिवासी त्रस्त आहेत. स्मार्ट सिटी कंपनीचे उपयोजन अद्ययावत असताना, तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या कशा. पालिकेची जुनाट ऑनलाइन यंत्रणा सोपी आणि हाताळण्यास सोयीस्कर होती, अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून दिल्या जात आहेत.
ऑनलाइन सुविधेतून मालमत्ता कर, पाणी देयक भरणा करणे, नागरी समस्येसंबंधी तक्रारी करणे, माहिती अधिकारातून माहिती पाठविणे आणि मागविणे, पालिकेच्या प्रशासकीय, लोकप्रतिनिधी राजवटीतील मागील २३ वर्षाच्या काळातील महासभा, प्रशासकीय ठराव, स्थायी समिती सभेचे ठराव आदी माहिती रहिवाशांना घर, कार्यालय बसल्या लॅपटॉपची एक कळ दाबली की मिळत होती. लोकाभिमुख प्रशासन या शीर्षाखाली पालिकेने २० वर्षापू्वी या ऑनलाईन सुविधा लोकांना उपलब्ध करून दिल्या आहेत.
संगणकीकृत यंत्रणा जुनाट झाल्याने प्रशासनाने या यंत्रणेचे उन्नत्तीकरण स्मार्ट सिटी प्रकल्पातून करण्याचा निर्णय घेतला होता. या यंत्रणेवर स्मार्ट सिटी कंपनीचे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी, तंत्रज्ञ काम करत होते.
उन्नत संगणकीकृत यंत्रणेचे २ मे रोजी आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आता पालिकेकडून जलद ऑनलाइन सुविधा मिळणार असे लोकांना वाटत होते. नवीन सुविधेत तांत्रिक अडथळे अधिक असल्याने नागरिक हैराण आहेत. प्रयत्न करूनही विवाह, मृत्यू दाखला ऑनलाइन मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. नागरी सुविधा केंद्र, प्रभाग कार्यालयात गेल्यावर आता ऑनलाइन विवाह, मृत्यू दाखले मिळणार असल्याने हस्तलिखित पध्दतीने कार्यालयातून दाखले दिले जात नाहीत, अशी उत्तरे कर्मचारी देत आहेत.
ऑनलाइन अडथळ्यांचा जाब विचारण्यासाठी रहिवासी नागरी सुविधा केंद्र, प्रभाग कार्यालयात येत आहेत. दररोज कर्मचारी, लोकांमध्ये वादाचे प्रसंग होत आहेत. उन्नत्तीकरणाची कामे स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी केली आहेत. त्याची उत्तरे त्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना द्यावीत, असे पालिका संगणक विभागातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
ऑनलाइन सेवेचे अद्ययावत उन्नत्तीकरण केले आहे. नवीन उपयोजन असल्याने काही तांत्रिक दोष निदर्शनास येत आहेत. ते तात्काळ दुरूस्त करून तत्पर ऑनलाईन सेवा नागरिकांना मिळेल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ऑनलाईन सेवेबाबत जशा सूचना, तक्रारी येत आहेत. त्या गतीने त्याची सोडवणूक केली जाते. दोष दूर झाल्यावर तत्पर सेवा नागरिकांना मिळेल अशी माहिती स्मार्ट सिटी कंपनी महाव्यवस्थापक प्रशांत भगत यांनी दिली आहे.