कल्याण-डोंबिवली महापालिकेचा खर्च चौकशीच्या फेऱ्यात; प्रत्येकी साडेतीन हजार रुपये खर्चून लावलेली झाडे बेपत्ता
‘हरित कल्याण-डोंबिवली’चा नारा देत महापालिकेने पाच वर्षांपासून सुरू केलेली वृक्षारोपण मोहीम वादात सापडली असून दोन्ही शहरांत सहा हजार ७४२ वृक्षांचे रोपण करण्यासाठी महापालिकेने आतापर्यंत ९२ लाख रुपये खर्च केल्याचे समोर येत आहे. एकीकडे लोकसहभागातून वृक्षलागवड करून या कामातील खर्च कमी करण्याचे राज्य सरकारचे धोरण असताना कल्याण-डोंबिवली महापालिकेने एका झाडाच्या लागवडीवर साडेतीन हजार रुपयांचा खर्च केला आहे. विशेष म्हणजे, ही झाडे कुठे लावली व किती जगली, याचा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे.
गेल्या पाच वर्षांमध्ये महापालिकेच्या उद्यान विभागाने शहरातील वेगवेगळ्या भागामध्ये सुमारे ६ हजार ७४२ झाडांचे वृक्षारोपण करण्यासाठी सुमारे ९२ लाख ४४ हजार ८०० रुपयांचा खर्च केल्याची बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे. विशेष म्हणजे महापालिकेने वृक्षारोपण करण्यासाठी ठेका दिलेल्या दहा कंपन्यांपैकी आठ कंपन्यांचा पत्ताच करारपत्रात नमूद केलेला नाही. त्यामुळे या कंपन्या नेमक्या कुठल्या आहेत याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. ठेकेदारांनी रस्त्यांलगत, मोकळय़ा जागी वृक्षारोपण करावे, असे कार्यादेश देण्यात आले होते. मात्र ही झाडे कुठे लावली याबाबत संभम आहे.
वृक्षारोपणासाठी सामाजिक संस्थांकडून आकारला जाणारा दर अतिशय जास्त असून एका झाडामागे साडेतीन हजार रुपयांहून अधिक रक्कम खर्च करण्यात आली आहे. त्याच्या देखभालीच्या खर्चाची रक्कमही अधिक आहेत. ही झाडे कशी लावावीत, त्यांच्या प्रजाती कोणत्या हव्यात, त्यांच्यावर कोणत्या प्रकारची कीटकनाशके फवारावीत याचा ठोस उल्लेख करारपत्रात नाही. झाडे लावलेल्या अनेक भागांत प्रत्यक्षात झाडेच नसल्याचे दिसून येत आहे. संरक्षण पिंजरे, झाडे, जमीन खणणे, देखभाल करणे यासाठी कमाल दर आकारत असून त्यामुळे पैशांची केवळ उधळपट्टी होत आहे, अशी टीका माहिती अधिकार कार्यकर्ता शैलेंद्र भगत यांनी केली आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
खर्च किती, कशासाठी?
- २०११ ते २०१५ या पाच वर्षांच्या काळात महापालिकेने वेगवेगळ्या दहा संस्थांना वृक्षारोपणाचे काम दिले होते. या संस्थांनी महापालिका क्षेत्रात १ हजार ७३२ झाडे लावली असून त्यासाठी ५० लाख २० हजार ९५५ रुपयांचा खर्च केला.
- महापालिका बाहेरील क्षेत्रात ५ हजार १० झाडे लावली असून त्यासाठी २४ लाख २४ हजार ७५० रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
- झाडांच्या देखभालीसाठी महापालिकेने ८ लाख २ हजार ५३१ रुपयांचा खर्च केला आहे.
- उर्वरित ९ लाख ९६ हजार ५५६ रुपयांच्या खर्चाचा तपशील महापालिकेने दिला नाही.
महापालिकेकडून करण्यात आलेला खर्च हा जिल्हा शेडय़ुल दर (डीएसआर) नुसार करण्यात आला आहे. रस्त्याच्या बाजूला झाडे लावण्यासाठी तसेच त्याच्या संरक्षण जाळीसाठी एका झाडाला ३५०० रुपयांपेक्षा जास्त खर्च येतो. त्यामुळे वृक्षरोपणासाठी महापालिकेने योग्य पैसे खर्च केले आहेत. झाडे लावण्याचा कंत्राट दिलेल्या संस्थांचे संपूर्ण पत्ते करारपत्रात नसले तरी महापालिकेच्या लेखा विभागात त्यांचे पत्ते उपलब्ध असतात.
– संजय जाधव, मुख्य उद्यान अधीक्षक, कल्याण-डोंबिवली महापालिका