१९९५ ते २००५ पर्यंत महापालिकेत नगरसेवक, महापौर झालेल्या, स्थायी समिती व इतर समित्यांचे सभापती व सदस्य झालेल्या मंडळींचा दहा वर्षांत प्रचंड उत्कर्ष झाला. पालिकेतील पदे स्वत:ची प्रगती करण्याचे साधन आहे, असे समजूनच प्रत्येक लोकप्रतिनिधीने तिजोरीवर ताव मारला. पण यात स्थायी समितीचे सभापती आणि सदस्य आघाडीवर होते. शहराचा सर्वांगीण विकास करण्यापेक्षा पदाधिकाऱ्यांमध्ये स्वविकास साधण्याची अहमहमिका लागली. स्वहित साधण्याची विकासाची हीच परंपरा मागील दहा वर्षे कल्याण डोंबिवली महापालिकेत सुरू आहे. शहर विकासाची दूरदृष्टी, आत्मीयता नसलेल्या या मंडळींनी महापालिकेच्या तिजोरीची अर्थात कपिला गायीची पांजरपोळातल्या भाकड गाईसारखी अवस्था करून ठेवली आहे.
रमेश सुकऱ्या म्हात्रे शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक. दोन वेळा स्थायी समितीचे सभापतीपद उपभोगून आजघडीला तिसऱ्यांदा पुन्हा त्याच पदावर विराजमान आहेत. पालिकेची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली असताना स्थायी समिती दर आठवडय़ाला कोटय़वधी रुपयांच्या कंत्राटांना मंजुरी देत सुटली आहे. रस्ते, खड्डे, सीमेंट रस्त्यांचा पेर, वाहतूक कोंडी यामुळे नागरिक हैराण आहेत. पायाभूत सुविधा देणे हे पालिकेचे पहिले कर्तव्य. मात्र, गेल्या चार वर्षांत या पालिकेने महापौर स्पर्धा, क्रीडाविषयक स्पर्धांवर तब्बल पावणे दोन कोटीहून अधिक रकमेचा चुराडा करून पदाधिकाऱ्यांनी स्वत:सह अधिकाऱ्यांच्या तुंबडय़ा भरण्याचा प्रयत्न केला आहे.
कधी काँग्रेसचे नारायण राणे तर कधी शिवसेना अशी शेपूट पकडून राजकीय प्रवास करणारे मल्लेश शिवान शेट्टी स्थायी समितीचे दोन वेळा सभापती झाले आहेत. पालिकेच्या प्रवेशद्वारावर शेट्टी यांचा दबदबा आहे. पालिका हद्दीत राबविणाऱ्या विकास कामांसाठी सतत निविदा प्रक्रिया करण्यात येतात. अनेक ठेकेदार या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पालिकेचे उंबरे झिजवतात. पण कोणाची निविदा पेटीपर्यंत जाण्याची हिंमत होत नाही. गेल्या दीड वर्षांत विकास कामांच्या चार ते पाच वेळा निविदा प्रसिद्ध करूनही ठेकेदार निविदा पेटीकडे फिरकत नाहीत. साधे परिवहन बस गाडय़ांचे भंगार खरेदी करणाऱ्या ठेकेदाराला रोखले जाते. तेथे अन्य विकास कामांचे काय?
वामन म्हात्रे स्थायी समितीचे तब्बल तीन वेळा सभापती झाले. त्यांनी सगळ्यांच्या पोटपूजा करून इतरांच्या चोचीत दाणे भरण्याचे काम प्रामाणिकपणे केले. साहेबांची मर्जी सांभाळण्याचा कौशल्याने प्रयत्न केला. त्यांच्या काळात विकास कामे थोडीफार पुढे सरकली, ठेकेदार, वास्तुविशारदांना दणके दिले. पालिकेच्या तिजोरीची लयलूट करणाऱ्यांना तुरुंगाचे रस्ते दाखवले. त्यांच्या काळात जशी विकास कामे झाली तशी कपडा दुकानांमधील तागे, पैठणींना चांगली मागणी होती. नगरसेवक, नगरसेविकांना भाऊबीज देण्यात त्यांचा हातखंडा होता. राजेंद्र देवळेकर, प्रकाश पेणकर ही जाणकार मंडळी पदावर बसल्यावर त्यांच्या मूळ निष्ठेपासून घसरली. भाजपचा तरुण नगरसेवक म्हणून सभापतीपदी विराजमान झालेले रवींद्र चव्हाण यांच्या सभापतीपदाच्या काळात केंद्र शासनाकडून ७००-८०० कोटीचा विकास निधी पालिकेत आला आणि दादांच्या पुण्याईने तो ठेकेदार आणि स्वहिताच्या खिशात गेला. बीओटी प्रकल्पासाठी पालिकेच्या जागा कवडीमोलाने ठेकेदारांच्या घशात घालून पालिकेचे कधी न भरून येणारे नुकसान या काळात झाले.
माजी महापौर पुंडलिक म्हात्रे यांचे चिरंजीव युवराज दीपेश म्हात्रे यांच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या कार्यकाळात कधी नव्हे एवढे विकासाचे कोटय़वधी रुपयांचे प्रकल्प स्थायी समितीने मंजूर केले.

Story img Loader