शासकीय आदेशानुसार महापालिकेचा प्रस्ताव
शहरांतील सर्वसामान्य तसेच गरीब रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवण्यासोबतच स्थानिक वैद्यक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मुंबई-ठाण्याला जावे लागू नये, यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. मांडा टिटवाळा येथील ३८ एकर आरक्षित जमिनीवर हे महाविद्यालय उभारण्याचा पालिकेचा विचार असून त्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात एक कोटी रुपयांची विशेष तरतूदही करण्यात आली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेची लोकसंख्या १५ लाख असून त्यात दिवसेंदिवस भर पडत आहे. यापैकी सुमारे ३० टक्के नागरिक महापालिकेच्या आरोग्य सेवेचा लाभ घेत असल्याचे मध्यंतरी महापालिकेमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात उघड झाले होते. सध्या महापालिकेची कल्याणमध्ये रुक्मिणीबाई व डोंबिवलीत शास्त्रीनगर अशी दोन रुग्णालये आहेत. याशिवाय सुमारे ११ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. मात्र, रुग्णालयातील उपलब्ध तज्ज्ञ डॉक्टर तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत महापालिका रुग्णालयांमधील उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणांवर भार वाढत चालला आहे. या पाश्र्वभूमीवर कल्याण, डोंबिवली शहरांच्या हद्दीत एक वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने आखला आहे.
कल्याण, डोंबिवली परिसरात एकही वैद्यकीय महाविद्यालय नाही. बहुतांशी महाविद्यालये नाशिक, संगमनेर, नवी मुंबई, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र भागात आहेत. कल्याण डोंबिवली भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी या शहरांकडे दररोज प्रवास करावा लागतो. शिवाय विद्यार्थी शुल्काच्या माध्यमातून त्या वैद्यकीय संस्थेसोबत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उत्पन्नातही भर पडत असते. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय उभारल्यास स्थानिक विद्यार्थ्यांची पायपीट टळू शकेल आणि पालिकेच्या उत्पन्नातही वाढ होईल, असे पालिकेच्या प्रस्तावात म्हटले आहे. यासाठी मांडा (टिटवाळा) येथे ‘आयसोलेशन हॉस्पिटल’साठी आरक्षित असलेला ३८ एकर भूखंड पालिकेने निवडला आहे. अर्थसंकल्पातही यासाठी एक कोटीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, हे महाविद्यालय राज्य सरकार, महापालिका आणि ‘सार्वजनिक खासगी भागीदारीतून’(पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) उभारण्याचा पालिकेचा मानस आहे.
महापालिका हद्दीत वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात आले तर या महाविद्यालयात स्थानिक विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य मिळेल. वैद्यकीय शिक्षणासाठी अन्य भागात जाण्याची गरज लागणार नाही.
अभ्यासासाठी येणारे शिकाऊ प्रशिक्षित डॉक्टर अर्धवेळ पालिका रुग्णालयात सेवा देऊ शकतील. दहा वर्षांपूर्वी नवी मुंबईतील तेरणा महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अरविंद प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नियमित सेवा देत होते. ती पद्धत पालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय उभे राहिले तर पुन्हा सुरू करता येईल, असे या प्रकल्पावर काम करणारे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी सांगितले.
सर्व स्तरातील रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळाली पाहिजे, हे राज्य सरकारचे धोरण आहे. यासाठी प्रत्येक जिल्’ाात किमान एक वैद्यकीय महाविद्यालय असावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी जाहीर केले आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली हद्दीसह परिसरातील सामान्यांना दर्जेदार रुग्णसेवा मिळाली पाहिजे, या विचारातून मांडा येथे पालिका वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा प्रस्ताव तयार करीत आहे.
-संजय घरत, अतिरिक्त आयुक्त, कडोंमपा