डोंबिवली पूर्व भागातील मानपाडा रस्त्यावरील कस्तुरी प्लाझा संकुलालगतची सुमारे ४०० मीटर लांब आणि ४० फूट रुंदीची रस्त्याची जागा मागील दहा वर्षांपासून ओस पडून आहे. पालिकेची ही महसूल मिळून देणारी महत्त्वाची मालमत्ता आहे. या रस्त्याच्या काही भागांत टाटा वीज वाहिनीचे मनोरे असले तरी, मोकळ्या असलेल्या जागेत रिक्षा, बस वाहनतळ, दुचाकी, चारचाकी वाहनतळ या ठिकाणी सुरू करता येऊ शकतो का, याचा आजवर कुणीही विचार केला नव्हता. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. पूर्व भागात वाहने उभी करण्यासाठी जागा नाहीत. आहेत ती वाहनतळे वाहनांनी गजबजलेली आहेत. तेव्हा ओसाड पडून असलेला हा टाटा वीज वाहिनीखालील मुख्य रस्ता एकेरी वाहतूक आणि वाहनतळ म्हणून उपयोगात आणला तर पालिकेला महसुलाचा लहान का होईना एक स्रोत तयार होईल, असा विचार पालिका अधिकारी आता करत आहेत.
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकापासून आठ मिनिटांच्या अंतरावर मानपाडा रस्त्यावरील कस्तुरी प्लाझा संकुलाच्या शेजारी टाटा वीज वाहिनीचे तीन ते चार वीज वाहक मनोरे आहेत. या मनोऱ्यांचा आधार घेऊन तीस वर्षांपासून टाटा वीज वाहिनीचे मनोरे असलेल्या भागात लहान लहान सुमारे २०० ते ३०० व्यावसायिक अनधिकृत टपऱ्या, गाळे काढून टिळक रस्ता ते शिवमंदिर रस्ता (मानपाडा रस्ता क्रॉस) या सुमारे तीनशे ते चारशे मीटर लांबीच्या पट्टय़ात व्यवसाय करीत होते. या पट्टय़ात नक्की काय चालले आहे हे अनेक वर्षे पालिकेला माहिती नव्हते. टिळक रस्त्यापासून ते शिवमंदिर रस्त्याच्या दरम्यान वीज वाहक मनोरे असले तरी, हा रस्ता सुमारे चाळीस फूट रुंदीचा आहे, हेही कोणाला माहिती नव्हते. या सगळ्या टपऱ्यांचे प्रकरण न्यायालयात होते. न्यायालयाने टाटा वीज वाहिनीखालील टपऱ्या तोडण्याचे आदेश दिल्यानंतर तत्कालीन आयुक्त धनराज खामतकर यांनी दुसऱ्या दिवशी मनोऱ्यांखालील बेकायदा टपऱ्या, गाळे तोडण्याचे आदेश दिले. एका दिवसात कारवाई करून सगळे गाळे जमीनदोस्त करण्यात आले. मग, पालिकेने या ४०० मीटरच्या पट्टय़ात परिवहन आगार, रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षा वाहनतळ सुरूकरण्याची योजना आखली. या जागेचे सर्वेक्षणही करण्यात आले. चर्चा, बैठका झाल्या. पण, या जागेतून वीज वाहक वाहिन्या गेल्या आहेत. त्यामुळे या भागात लोकांचा वावर असेल तर सार्वजनिक कामासाठी जागा वापरू नये, असे वीज वाहक कंपनीने पालिकेला कळविले. तोच धागा पकडून मग, इच्छाशक्ती नसलेले नगरसेवक, अधिकारी या ठिकाणी काहीही करता येणार नाही, असा सूर आळवत बसले.
४०० मीटरचा लांबीचा आणि ४० फूट रुंदीचा एक प्रशस्त रस्ता शहराच्या मोक्याच्या ठिकाणी उपलब्ध झाला आहे. भले या मार्गातून मनोरे गेले असले तरी, त्याचा लोककार्यासाठी काही विधायक उपयोग करावा, हा विषयच मागे पडला. दूरदृष्टी ठेवून शहरहितासाठी, सर्वसामान्यांसाठी काही करावे, बहुतांशी नगरसेवकांजवळ हा विचार नाही. हेच नगरसेवक नंतर पदाधिकारी होऊन, त्यांच्याच चक्रव्यूहात अडकत जातात. त्यामुळे त्यांना कधी टाटा वीज वाहिनीखालील जागेचा वापर करावा, असे गेल्या दहा वर्षांत वाटले नाही.
हळूहळू या रिकाम्या जागेत नगरसेवक निधी संपला पाहिजे म्हणून एक उद्यान उभारण्यात आले. एका माजी नगरसेवकाचा या भागात हॉटेल व्यवसाय, आजूबाजूला पाणी, भेलपुरीचा व्यवसाय तेजीत आहे. याच भागात कचरा वेचक महिलांचे केंद्र आहे. वाहने दुरुस्तीच्या कार्यशाळा या ठिकाणी आहेत. पालिकेच्या या जागेचा यथेच्छ वापर ही सर्व मंडळी करीत आहेत. सुरुवातीला या रिकाम्या रस्त्यावर टिळक रस्ता ते शिवमंदिर रस्त्यादरम्यान राहणाऱ्या रहिवाशांची काही वाहने उभी राहत असत. आता या रहिवाशांची वाहने दूरच, या ठिकाणी दररोज सुमारे दोन ते तीन हजार दुचाकी, शंभर चारचाकी वाहने टाटा वीज वाहिनीखालील जागेत अस्ताव्यस्त लावण्यात येतात. यामुळे परिसरातील रहिवाशांना आपली वाहने इमारतीच्या आवारात नेणे अनेक वेळा अवघड होऊन बसते.
डोंबिवली पूर्व भागात २७ गावे, लोढा हेवन परिसर, शिळफाटा, एमआयडीसी परिसरातून मुंबई परिसरात नोकरीसाठी जाणारा चाकरमानी आपल्या दुचाकीने डोंबिवली पूर्व भागात वाहनाने येतो. वाहतूक पोलिसांच्या सम-विषम तारखेप्रमाणे रस्त्याच्या कोपऱ्यावर वाहन उभे करतो आणि निघून जातो. ज्याला अशा ठिकाणी वाहन उभे करण्यास मिळत नाही तो, टाटा लाइनखाली येऊन वाहन उभे करतो. टाटा वाहिनीखालील जागा ही सुरक्षित असल्याने वाहन चालक बिनधास्तपणे या ठिकाणी वाहने उभी करून निघून जातात. काहीजण तर घरी वाहन ठेवण्यास जागा नाही. त्यामुळे टाटा लाइनखालील जागेचा वापर करतात. इतका या जागेवर वाहन चालकांनी ताबा मिळविला. कस्तुरी प्लाझा संकुलात बँका, मुद्रांक विक्री, तत्सम कार्यालये आहेत. या ठिकाणी येणारा विकासक, व्यावसायिक, जमीन मालक आपली मोठी गाडी टाटा लाइनखाली उभी करून तासन्तास कस्तुरी संकुलात घुटमळत असतो. टाटा लाइन म्हणजे वाहने उभी करण्याचा मोकळा बाजार झाला आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव असला की स्थानिक मंडळे येथे दणक्यात उत्सव साजरा करतात. रात्री दहा वेळेचे बंधन असल्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांची डोकेदुखी कमी झाली आहे. अन्यथा, पहाटेपर्यंत उत्सवी उन्मादाने रहिवासी हैराण व्हायचे.
टाटा लाइनखाली सध्याच्या घडीला सुमारे दोन ते तीन हजार दुचाकी, पन्नास ते शंभर चारचाकी उभी असतात. या वाहनतळावरुन पालिकेला एक पैशाचा महसूल मिळत नाही. याउलट वाहन चालकांच्या ताब्यात गेलेली ही जागा पालिकेने ताब्यात घेऊन, या ठिकाणी नियोजन करून वाहनतळ सुरू केले, तर आर्थिकदृष्टय़ा खंगत चाललेल्या पालिकेला उत्पन्नाचा एका स्रोत तयार होईल. त्या दृष्टीने आता हालचाली सुरू झाल्या आहेत. याचा सर्वाधिक आनंद टाटा लाइनच्या दुतर्फा राहणाऱ्या रहिवाशांना झाला आहे.
काही दिवसांपूर्वी पालिका पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी टाटा वीज वाहिनीखालील मोकळ्या जागेची पाहणी केली. या अस्ताव्यस्त पडलेल्या जागेचा पालिकेच्या हितासाठी काही उपयोग करता येईल का याचा विचार सुरू केला आहे. टाटा लाइनखाली रस्त्याच्या एका बाजूने शिवमंदिर ते टिळक रस्त्यापर्यंत पहिल्या माळ्यापर्यंत बांधकाम केले. तर पहिल्या माळ्यावर सुमारे, काही भागांत तळाला सुमारे चार ते पाच हजार दुचाकी वाहने या भागात उभी राहतील. तसेच, तळमजल्याला सुमारे तीनशे ते चारशे चारचाकी वाहने उभी राहू शकतील. ही सगळी व्यवस्था पालिकेने खासगीकरणाच्या माध्यमातून चालवायला दिली, तर एक रोजगाराचे साधन या भागात तयार होईल. पालिकेला हक्काचा दर महिन्याला काही हजारांचा उत्पन्नाचा स्रोत सुरू होईल.
पूर्व भागात पी. पी. चेंबर्स मॉलमधील वाहनतळ सोडला तर पूर्व भागात प्रशस्त वाहनतळ नाही. त्यामुळे बहुतांशी वाहने वाहतूक पोलिसांच्या सूचनेप्रमाणे रस्त्याच्या कडेला सम, विषम तारखेला उभी केली जातात. ही वाहने टाटा वाहनतळावर उभी केली जातील. फुकट जागा वापरायची जी सवय सामान्यांना लागली आहे तिलाही थोडा चाप लागेल. पैसे मोजायला लागल्यावर वाहन शिस्तीत उभे करायचे असते
याचेही धडे वाहन चालकांना मिळतील. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांचे प्रमाण कमी होणार असल्याने वाहतूक कोंडीला काही प्रमाणात आळा बसेल.

Story img Loader