कल्याण- कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील येत्या ५० वर्षाच्या काळातील लोकसंख्या विचारात घेऊन पालिका प्रशासनाने वाढत्या लोकवस्तीची गरज विचारात घेऊन पाणी पुरवठ्याच्या योजना केंद्र शासनाच्या अमृत टप्पा दोन योजनेतून हाती घेतल्या आहेत. या योजनेतील ३०३ कोटीच्या कल्याण डोंबिवली पालिकेच्या पाणी प्रकल्पाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मंजुरी दिली.
राज्य शासनाच्या (एसएलपीसी) आवश्यक मंजुरी आणि निधीच्या उपलब्धतेनंतर तातडीने ही कामे हाती घेण्यात येतील, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांनी दिली. कल्याण डोंबिवली पालिकेची लोकसंख्या आता २० लाखाच्या पुढे आहे. या लोकवस्तीसाठी पालिका विविध जलस्त्रोतांमधून ३७० दशलक्ष पाणी उचलते. वाढत्या लोकवस्तीप्रमाणे पाण्याची गरज वाढणार असल्याने आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, शहर अभियंता अर्जुन अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांनी भविष्यातील पाण्याची गरज आणि नवीन जलस्त्रोतांची उपलब्धता या अनुषंगाने आराखडे तयार केले आहेत.
हेही वाचा >>> डोंबिवली : २७ गावांतील संदपमधील पाणी चोराविरुद्ध गुन्हा दाखल
येत्या ५० ते ७५ वर्षापर्यंत पालिकेची लोकसंख्या ५० लाखाच्या पुढे जाणार आहे. या लोकसंख्येसाठी दैनंदिन सुमारे एक हजार ते तेराशे दशलक्ष लीटर पाण्याची गरज लागणार आहे. हा भविष्यवेधी विचार करुन पाणी पुरवठा विभागाने अमृत टप्पा दोन योजनेतून ३०३ कोटीचा विस्तारित पाणी योजनेचा प्रकल्प गेल्या वर्षी शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला होता. या प्रकल्पाची गरज ओळखून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या प्रकल्पाला नुकतीच मंजुरी दिली. शासनाच्या ‘एसएलपीसी’ समितीची मंजुरी मिळाली की हा प्रकल्प केंद्र शासनाकडे पाठवून निधीच्या प्रक्रिया सुरू होतील, असे मोरे यांनी सांगितले. निधीची उपलब्धता, निविदा प्रक्रिया आणि ठेकेदार नियुक्तीनंतर ही कामे तातडीने सुरू केली जातील, असे ते म्हणाले.
विस्तारित पाणी योजना
अमृत टप्पा दोन योजनेतून शहराच्या विविध भागात चार जलशुध्दीकरण केंद्र उभारण्यात येणार आहेत. २० वर्षाहून अधिक काळाच्या जलवाहिन्या बदलून त्या ठिकाणी नवीन जलवाहिन्या टाकण्याची कामे हाती घेतली जाणार आहेत. उल्हास नदीवरील मोहिली येथील पाणी पुरवठा केंद्र महापुराच्या काळात पाण्याखाली जाते. ते नदी पातळीपासून २० फूट उंच बांधून तेथे पाणी खेचणाऱ्या मोटारांची व्यवस्था करणे. तेथेच तळ, उन्नत टाकीची उंचीवर व्यवस्था करण्याचे काम केले जाणार आहे.
हेही वाचा >>> ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा पुढील चोवीस तास बंद राहणार
२७ गावांमध्ये नवीन जलशुध्दीकरण केंद्र उभारली जाणार आहेत. कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, २७ गाव भागात नवीन जलकुंभांची उभारणी करणे, नव्याने विकसित होणाऱ्या भागात जलवाहिन्या, जलकुभांची व्यवस्था करणे. ही कामे अमृत टप्पा दोन योजनेतून हाती घेतली जाणार आहेत.
“पालिका हद्दीतील आगामी काळातील वाढती वस्ती, पाण्याची वाढती गरज विचारात घेऊन आयुक्त, शहर अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यवेधी पाणी प्रकल्प अमृत योजनेतून तयार केले आहेत. या टप्प्याच्या दुसऱ्या भागाला ‘एमजीपी’ची मंजुरी मिळाली आहे. आवश्यक मंजुऱ्या, निधीच्या उपलब्धतेप्रमाणे ही कामे तातडीने सुरू केली जातील. भविष्यवेधी पाणी प्रकल्पांचे आराखडे तयार करण्याची कामे सुरू आहेत.”
प्रमोद मोरे – कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग