कल्याण-डोंबिवली पालिकचे संकेतस्थळ गेल्या महिन्यापासून बंद आहे. पालिकेतून ऑनलाईन पद्धतीने सेवा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या रहिवाशांची यामुळे कुचंबणा होत आहे. संकेतस्थळ बंद असल्याचे कोणतेही कारण पालिकेकडून जाहीर केले जात नसल्याने पालिका हद्दीतील रहिवासी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. कल्याण-डोंबिवली पालिकेने रहिवाशांना देण्यात येणाऱ्या बहुतांशी सुविधा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिल्या आहेत. मालमत्ता कर, पाणी देयके, माहिती अधिकार अर्ज, या अर्जाची माहिती ऑनलाईन उपलब्ध करून देणे, पालिकेच्या स्थापनेपासून पालिकेची समग्र माहिती, महासभेने गेल्या 23 वर्षांत केलेले ठराव, पालिकेत घडणाऱ्या दैनंदिन घडामोडी त्याची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध असते.
गेल्या महिन्यापासून पालिकेचे संकेतस्थळ बंद असल्याने घर, कार्यालयातून कर भरणाऱ्या रहिवाशांची गैरसोय होत आहे. संगणकीकृत झालेली कल्याण डोंबिवली महापालिका ही देशातील पहिली महापालिका आहे. माजी आयुक्त श्री कांत सिंग यांच्या कारकिर्दीत पालिकेचे वीस वर्षांपूर्वी संगणकीकरण करण्यात आले होते. तेव्हापासून ती जुनाट यंत्रणा प्रशासनाकडून वापरली जाते.
“पालिकेची संगणक प्रणाली जुनी झाली आहे. या प्रणालीची उन्नतीकरण करण्याचे काम स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून केले जात आहे. स्मार्ट सिटी कंपनीची स्वतंत्र तंत्रज्ञ यंत्रणा उन्नती करण्याचे काम करत आहे. ये उन्नत्तीकरणाचे काम करणाऱ्या स्मार्ट सिटीच्या नवतरुण अभियंत्यांना पालिका प्रशासकीय कामाचा अनुभव नाही. त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून अतिशय संथ गतीने संगणकीकरणाच्या उन्नती करण्याचे काम सुरू आहे. स्मार्ट सिटी निधीतून हे काम सुरू असल्याने पालिकेला तिथे हस्तक्षेप करता येत नाही किंवा या कामासाठी स्वतंत्र निधीतून काम करता येत नाही. पालिका प्रशासनाच्या आधिपत्याखाली उन्नती करण्याचे काम झाले असते तर, प्रशासकीय कामाच्या खाचाखोचा पालिका अधिकाऱ्यांना माहिती असल्याने हे काम लवकर झाले असते”, अशी माहिती एका विश्वसनीय तंत्रकुशल पालिका सूत्राने दिली.
“पालिकेचे संकेतस्थळ बंद नाही. ती संथगतीने चालते. दररोज किमान पाचशे करदाते ऑनलाइन पद्धतीने कर भरणा करता,” अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. पालिकेचे संकेतस्थळ नेहमी तपासणाऱ्या डोंबिवलीतील एका तंत्रकुशल तरुणाने सांगितले, ” पालिका अधिकारी चुकीची माहिती देत आहेत. अनेक वर्ष मी स्वतः दररोज पालिकेचे संकेत स्थळ पाहतो. गेल्या महिन्यापासून ते बंद आहे”.
“पालिकेचे संकेतस्थळ बंद नाही. ते संथगतीने सुरु आहे. संगणक प्रणालीच्या उन्नतीकरण्याचे काम सुरू आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल. गतिमान ऑनलाईन सेवा रहिवाशांना मिळेल”. – प्रमोद कांबळे, सिस्टीम ॲनालिस्ट, संगणक विभाग कल्याण-डोंबिवली पालिका.