संतप्त प्रवाशांचा दीड तास घेराव; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला
डोंबिवली पूर्व भागातील बाजीप्रभू चौकातील बस थांब्यावर एमआयडीसीत जाणारी निवासी बस २० मिनिटे झाली तरी का आली नाही म्हणून तान्हुले बाळ हातात असलेल्या एका महिला प्रवासी केडीएमटीच्या नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्याला विचारणा करण्यास गेली. त्यावेळी संबंधित कर्मचाऱ्यासह तेथील चालक, वाहक यांनी त्या महिलेशी मंगळवारी रात्री हुज्जत घातली. बस उशिरा आणून पुन्हा एका महिलेशी अरेरावी केल्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी केडीएमटी कर्मचाऱ्यांना धडा शिकविण्याचा निर्णय घेतला. सुमारे २०० ते ३०० प्रवासी, पादचारी जमले आले होते. मात्र घटनास्थळी पोलीस आल्यामुळे पुढील अनर्थ टळला. दीड तास हा गोंधळ सुरू होता.
बाजीप्रभू चौकातून एमआयडीसी निवासी भागात जाण्यास बस असतात. रिक्षाला १५ रुपये मोजण्यापेक्षा प्रवासी ८ रुपये भाडे देऊन महापालिकेच्या बसने प्रवास करणे पसंत करतात. मंगळवारी संध्याकाळी ७.४० वाजल्यापासून अनेक प्रवाशांबरोबर हातात दोन महिन्याचे तान्हे बाळ घेऊन एक महिला प्रवाशांच्या रांगेत उभी होती. उभे राहून अस्वस्थ वाटू लागल्याने ही महिला बस थांब्यातच बाळासह खाली बसली. बराच वेळ बस येत नाही म्हणून या महिलेने नियंत्रण कक्षात जाऊन बस नियंत्रकाला बस अद्याप का येत नाही म्हणून विचारणा केली. हातात तान्हे बाळ असल्याने नियंत्रकाने त्या महिलेशी सौजन्याने बोलणे आवश्यक होते. याऊलट नियंत्रकाने ‘तुम्हाला कळत नाही का. तुम्ही आताच आला आहात. पुन्हा बस का आली नाही म्हणून विचारणा करता. बस तुमच्या पाठीमागे उभी आहे’, अशी उलटसुलट विधाने करून नियंत्रक त्या महिलेशी हुज्जत घालू लागला.
हा प्रकार पाहून मुंबई सेंट्रल येथून नोकरीहून परतलेल्या एमआयडीसीत राहात असलेल्या मंजूषा जाधव यांनी नियंत्रकाला ‘ती महिला वीस मिनिटे रांगेत उभी आहे. तिला सहानुभूतीचे दोन शब्द सांगण्याऐवजी तुम्हीच तिच्याशी उद्धटपणे बोलता. वीस मिनिटे बस थांब्यावर नाही. प्रवासी दीड ते दोन तासांचा लोकल प्रवास करून लवकर घरी जाण्याच्या इराद्याने केडीएमटीच्या थांब्यावर येतात. त्यांना बस उपलब्ध करून देण्याऐवजी तुमची बस उशिरा येऊनही, तुम्ही परत महिलेला दटावण्याचा का प्रयत्न करता’ असा प्रतिप्रश्न केला.
चालकाचाही विरोध
बस उशिरा का आणली म्हणून जाब विचारण्यासाठी मंजूषा जाधव या चालकाच्या बाजूकडील दरवाजातून बसमध्ये चढू लागल्या. त्यांना चालक, वाहकाने विरोध केला. त्यामुळे प्रवासी, बाजूचे पादचारी संतप्त झाले. केडीएमटी कर्मचाऱ्यांची अरेरावी पाहून सुमारे ३०० लोकांचा समुदाय बाजीप्रभू चौकात जमा झाला. यांच्या बस फोडा तेव्हा यांना प्रवाशांची ताकद कळेल, असा गलका प्रवाशांनी सुरू केला. जाधव यांनी असे नुकसान करून काही मिळणार नाही, असे सुचविले. तात्काळ नियंत्रकाने पोलिसांना दूरध्वनी केला. रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश पळधे व त्यांचे सहकारी घटनास्थळी आले. त्यांनी प्रवाशांची समजूत घातली. नियंत्रकाला शांत केले. त्यानंतर केडीएमटी कर्मचारी आणि बसवर ओढावलेला अनर्थ प्रसंग टळला.
बस वेळेवर उपलब्ध करा..!
एमआयडीसीत जाण्यासाठी दुपटीने भाडे देण्याची अनेक प्रवाशांची तयारी नसते. म्हणून काही प्रवासी बसचा मार्ग पत्करतात. नियमित गर्दीचा अंदाज घेऊन केडीएमटीने बाजीप्रभू चौकात बस वेळेवर उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. केडीएमटीच्या वरिष्ठांनी या घटनेची दखल घ्यावी, अशी मागणी प्रवासी वर्गाकडून यावेळी करण्यात आली.
– मंजूषा जाधव, प्रवासी