कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन सेवेतर्फे (केडीएमटी) येत्या १५ दिवसांत बदलापूपर्यंत बससेवा सुरू करण्यात येणार आहे. या बस सेवेमुळे बदलापूरच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. साधारणत: दर २० ते ३० मिनिटांनी या मार्गावर बसच्या फेऱ्या होणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
– सध्या बदलापूर शहरातून नवी मुंबई महापालिकेच्या वाशीपर्यंतची बससेवा सुरू आहे. यात आता कल्याण-बदलापूरची बससेवा सुरू होणार असल्याने गर्दीच्या वेळी महिला आणि वृद्ध प्रवाशांना एक चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे. उल्हासनगर महापालिकेतर्फे खासगी बससेवेच्या माध्यमातून बदलापूर ते कल्याण मार्गावर बससेवा सुरू करण्यात आली होती. या बससेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद होता, मात्र गेल्या काही महिन्यांपासून ही सेवा बंद झाली आहे. ‘केडीएमटी’तर्फे यापूर्वीही या मार्गावर बस सेवा सुरू करण्यात आली होती, परंतु अधिकारी आणि राजकीय इच्छाशक्तीमुळे ही बससेवा बंद झाली. याची पुनरावृत्ती होऊ नये, हीच अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
–
– दर अध्र्या तासाला फेऱ्या
– उल्हासनगर महापालिकेची कल्याण-बदलापूर सेवा बंद झाल्यानंतर केडीएमटीला जाग आली आहे. या मार्गावर केडीएमटीतर्फे बदलापूर रेल्वे स्थानक ते कल्याण रेल्वे स्थानक (प.) मार्गे शांतीनगर या १७ किमी प्रवासासाठी २२ रुपये तिकीट असेल. कल्याण रेल्वे स्थानक ते अंबरनाथ रेल्वे स्थानक मार्गे १, २, ३, ४, ५ कॅम्प या १३.७ कि.मी.साठी १९ रुपये तिकीट असेल, तर अंबरनाथ रेल्वे स्थानक ते कल्याण रेल्वे स्थानक मार्गे व्हीटीसी, श्रीराम, विठ्ठलवाडी आणि तिसगाव या १८.१ कि.मी. साठी २२ रुपये तिकिट असेल. प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभला तर बसच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार असल्याचे सूत्राने सांगितले.
– केडीएमटीच्या ताफ्यात १८५ नवीन बस
– केडीएमटीच्या ताफ्यात एकूण १८५ नवीन बस येणार आहेत. त्यापैकी १० बस आल्या असून टप्प्या-टप्प्याने बसची संख्या वाढणार आहे. सध्या केडीएमटीच्या ताफ्यात ९४ बस असून एकूण ३६ विविध मार्गांवर बसच्या सुमारे १२०० फेऱ्या होत आहेत. प्रामुख्याने वाशी, पनवेल, हाजी मलंग, भिवंडी आदी मार्गाचा यात समावेश आहे. भिवंडी, डोंबिवली निवासी, पनवेल, वाशी या मार्गावरील बस फेऱ्यांना चांगला प्रतिसाद लाभत असल्याने या फेऱ्या नफ्यात आहेत. ज्या प्रमाणे बसची संख्या वाढेल, त्याप्रमाणात काही मार्गावरील बसच्या फेऱ्यांमध्ये वाढ होणार आहे. प्रवाशांच्या मागणीनुसारच बस फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. त्याप्रमाणे एकूण ५० नवीन मार्गावर बस सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे केडीएमटीचे महाव्यवस्थापक सुधीर राऊत यांनी सांगितले.
–
– केडीएमटीला महिना ८० लाखांचा तोटा
– केडीएमटीचे दिवसाचे उत्पन्न सुमारे ५ लाख ९८ हजार आहे. तर दर दोन दिवासांनी सुमारे १२ हजार लिटर डिझेल परिवहन आणि पालिकेच्या वाहनांना लागते. त्यासाठी सुमारे ७ लाख रुपये खर्च होत आहे. त्याचबरोबर पुर्वी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पगारावर म्हणजेच आस्थापनाचा खर्च ७० ते ८० लाख रुपये व्हायचा तो सहाव्या वेतन आयोगामुळे २०११ पासून हा खर्च १ कोटी ३० लाखांवर गेला आहे. परिणामी ही परिवहन सेवा तोटय़ात असून दर महिन्याला सुमारे ८० लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. काही राजकीय मंडळी आणि अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळेच परिवहन सेवा डबघाईला आल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.