भाडे सुसूत्रीकरणातून बसच्या तिकीट दरांत १ ते ३ रुपयांची कपात
नेहमीच तोटय़ाचे तुणतुणे वाजविणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमाने प्रवासी भाडय़ात सुसूत्रीकरणाचा प्रयत्न सुरू केला असून अधिकाधिक प्रवासी परिवहन सेवेकडे आकृष्ट व्हावेत, यासाठी प्रवासी भाडय़ात १ ते ३ रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. किलोमीटर टप्प्याऐवजी प्रवाशांना आता ठरावीक थांब्यांसाठी ठरावीक भाडय़ाचे तिकीट मिळणार आहे. रेल्वेचा प्रवास करताना प्रवाशाने ठाण्याचे तिकीट काढले तर तो प्रवासी त्याच तिकिटावर भांडुपपर्यंत प्रवास करू शकतो. त्याचप्रमाणे केडीएमटीत बसलेला प्रवासी उतरणाऱ्या थांब्यानंतर पुढचे दोन थांबे त्याच तिकिटावर प्रवास करू शकणार आहे, अशी माहिती परिवहन विभागातील अधिकाऱ्याने दिली. लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमाने तिकिटांच्या दरात फार कपात केलेली नाही. मात्र, सुसूत्रीकरणामुळे काही मार्गावर प्रवाशांना दिलासा मिळणार आहे, असा दावा सूत्रांनी केला. बेस्ट उपक्रमाने मध्यंतरी घटलेली प्रवासी संख्या वाढविण्यासाठी तिकीट भाडय़ात सुसूत्रीकरणाचा निर्णय घेतला होता. याच धर्तीवर कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमाने यासंबंधीचे सुधारित प्रस्ताव तयार केले आहेत. केडीएमटीने शासनाकडे प्रवासी भाढे कमी
करण्यासाठी प्रस्ताव पाठविला होता. हा प्रस्ताव तीन महिन्यापूर्वीच मंजूर होऊन आला आहे. या प्रस्तावाला एमएमआरडीए, परिवहन आयुक्त, नगरविकास विभागाने मान्यता दिली आहे. कल्याण-डोंबिवली शहर परिसरात २ किलोमीटर ते ५० किलोमीटर पट्टय़ात धावणाऱ्या ‘केडीएमटी’ बसगाडय़ांचे थांबे तसेच किलोमीटरप्रमाणे त्या प्रवासाचे भाडे याचे नियोजन करण्यात वेळ गेला. त्यामुळे भाडे कपातीची अंमलबजावणी करण्यास वेळ लागला, असे सूत्राने सांगितले.

५ रुपये भाडे दर
* कल्याण रेल्वे स्थानक ते प्रेम ऑटो ते भवानी चौकापर्यंत, लालचौकी, नेतिवली, वालधुनी ते प्रकाश ऑटोपर्यंत, शिवाजी चौक, पत्रीपूल, मेट्रो मॉल, फूल बाजार, रामबाग, रहेजा संकुल, नेतिवली.
* डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक ते स्टार कॉलनी, आजदेगाव, पी अॅण्डी टी कॉलनी, साईबाबा मंदिर ते शिवाजी उद्योगनगर.
१० रुपये भाडे दर
* कल्याण पश्चिम ते खडकपाडा, बिर्ला महाविद्यालय, सहय़ाद्रीनगर, वसंत व्हॅली आगार, उंबर्डे, श्री कॉम्पलेक्स, अग्रवाल महाविद्यालय, टावरीपाडा, साईचौक, गांधारी पर्वत, योगीधाम, मोहना कॉलनी, कोनगाव, दुर्गाडी, शहाड फाटक, नेवाळी पाइपलाइन, दावडी नाका, साईबाबा मंदिर (भिवंडी रस्ता).
* डोंबिवली पूर्व ते निवासी (एमआयडीसी) विभाग, दावडी, नवनीतनगर, रिव्हरवूड पार्क, भोपर, देसाई गाव, द्वारली, भाल, विको नाका.
१५ रुपये भाडे दर
* कल्याण पश्चिम ते गोपाळनगर भिवंडीपर्यंत, मानिवली, बल्याणी गाव. डोंबिवलीत लोढा हेवन, सोनारपाडा, मानपाडा.

असा दिलासा मिळणार!
केडीएमटीमधून प्रवास करताना जो प्रवासी यापूर्वी दोन किमीसाठी सहा रुपये मोजत होता. त्याच प्रवाशाला त्यापुढील एक ते दोन थांब्यांसाठी पाच रुपयांत प्रवास करणार आहे. तसेच ८ किमी प्रवासासाठी १३ रुपये मोजणाऱ्या प्रवाशांना त्याच प्रवासासाठी व त्यापुढील एक ते दोन थांब्यांसाठी १० रुपये तिकीट दर आकारले जाणार आहे. वाहकाला प्रवाशाला तिकीट देताना सुट्टय़ा पैशांचा प्रश्न नको आणि एखादा प्रवासी चुकून गन्तव्य स्थानापेक्षा पुढील थांब्यापर्यंत पोहोचला तर त्या प्रवाशाची अडचण नको म्हणून किलोमीटरपेक्षा निश्चित भाडे ठरवून केडीएमटीचा प्रवास आता सुकर करण्यात आला आहे.

‘केडीएमटी’ला तिकीट भाडय़ात सुसूत्रीकरण करण्यासाठी शासनाकडून अत्यावश्यक असलेल्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. तिकीट भाडय़ाच्या सुसूत्रीकरणाचे काम सुरू आहे. याबाबत येत्या दोन दिवसांत योग्य निर्णय घेण्यात येईल.
-देविदास टेकाळे , महाव्यवस्थापक,
केडीएमटी, कल्याण

Story img Loader