ठाणे: मुंबई आणि ठाण्याच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेली कमान सुमारे वर्षेभरापूर्वी पाडण्यात आली होती. या कमानीवर शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे नाव होते. ही कमान अद्यापही उभारण्यात आली नसल्याने आनंद दिघे यांचे पुतणे तथा ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी ठाण्यात दिघे साहेबांच अस्तित्व कोण पुसतंय असा प्रश्न उपस्थित केला आहे.
ठाणे आणि मुंबईच्या वेशीवर म्हणजेच आनंद नगर जकात नाका येथे अनेक वर्षांपासून एक कमान होती. त्या कमानीला शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे नाव देण्यात आले होते. ही कमान काही कामानिमित्त महापालिका प्रशासनाने काढली होती. त्याठिकाणी नव्याने कमान उभारण्यात येईल असा दावा महापालिका प्रशासनाने केला होता. परंतू, ही कमान काढून दीड वर्षे उलटून गेले तरी, महापालिका प्रशासनाकडून अद्याप याठिकाणी कमान उभारण्यात आलेली नाही. त्यामुळे ठाण्यात दिघे साहेबांच अस्तित्व पुसलं जातंय का? , यामागचा नेमका उद्देश काय आहे, असा प्रश्न ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी उपस्थित केला आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे अस्तित्व ठाण्यातून पुसण्याचे काम नक्की कोण करत आहे, याचे उत्तर ठाणे महापालिकेने द्यावे असे केदार दिघे म्हणाले. महापालिका प्रशासनाकडून दिखाव्यासाठी सुशोभिकरण केले जाते, दीपस्तंभ उभारण्यात येतात. तर, आनंद दिघे यांच्या नावाचे प्रवेशद्वार उभारण्यास विलंब का होत आहे, हे महापालिकेने स्पष्ट करावे. हा प्रवेशद्वार उभारण्यात होत असलेली दिरंगाई चिंताजनक आहे, असेही केदार दिघे यावेळी म्हणाले.