ठाणे : सिडको महामंडळाने खारघर तुर्भे लिंक रोडसाठी २१०० कोटी रुपये खर्च करुन दुहेरी बोगदा आणि रस्त्याचे काम हाती घेतले आहे. परंतु खारघर डोंगररांगावरील पर्यावरण आणि वन्यजीवांची हानी लक्षात घेणारा ‘पर्यावरण परिणाम मूल्यांकनाचा अहवाल’ येण्यापूर्वीच हे काम केले जात असल्याची माहिती मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

माहिती अधिकार कायद्यात महाराष्ट्र किनारपट्टी प्रभाग व्यवस्थापन प्राधिकरणाकडे (एमसीझेडएमए) या प्रकल्पाचा पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन अहवालासाठी पाठपुरावा केल्यावर ही बाब स्पष्ट झाली. त्यामुळे प्रकल्पाला पर्यावरण विभागाच्या परवानगीबाबत साशकंता आहे. खारघरभोवती हजारो हेक्टरवरील विस्तारलेल्या डोंगर रांगांवरील नैसर्गिक साधनसंपत्तीची भुरळ निसर्गप्रेमींना पडल्याने येथे शेकडो जणांनी घरखरेदी केली आहे.

हेही वाचा >>>टपाल कार्यालयांच्या दुरावस्थेमुळे नागरिक त्रस्त; आमदार संजय केळकर यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक

खारघर तुर्भे लिंकरोड या प्रकल्पामुळे थेट तळोजा, खारघर आणि पनवेलच्या वाहनचालकांना काही मिनिटांत तुर्भे गाठता येणार आहे. परंतु मागील महिन्यापासून येथील सुवर्ण कोल्हे, बिबट्याच्या वावरामुळे पर्यावरण प्रेमींनी वन्यजीवांच्या स्थलांतराचा विषयावर प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. एमसीझेडएमए यांना अजूनही या प्रकल्पाचा परिणाम मूल्यांकन अहवाल मिळाला नसल्याने नेक्ट कनेक्ट फाऊंडेशनचे बी. एन. कुमार यांनी चिंता व्यक्त केली आहे. याबाबत सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांच्याशी संपर्क साधला मात्र संपर्क होऊ शकला नाही.

वन विभागाने एकेकाळी पांडवकडा धबधबा परिसराला इको-टुरिझम साइट म्हणून विकसित करण्याची योजना आखली होती आणि रस्त्याच्या प्रकल्पामुळे ही योजना पूर्णपणे वाया गेली आहे.- ज्योती नाडकर्णी, संयोजक, खारघर हिल्स अँड वेटलँड्स फोरम

Story img Loader