अन्न व औषध प्रशासनाच्या कोकण विभागाच्या वतीने शुक्रवारी भिवंडी आणि कल्याण येथे धडक कारवाई करून ३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये कल्याण येथील एका वाहनातून २५ लाख ८२ हजार रुपये किमतीचा खवा आणि भिवंडी येथिल एका गोदामातून ६ लाख ८१ हजार रुपये किंमतीचे खाद्यतेल जप्त करण्यात आले आहे.
दिवाळीच्या दरम्यान खाद्यपदार्थांना मोठी मागणी असते. यामध्ये ग्राहकांकडून विविध प्रकारच्या मिठाईंची मोठया प्रमाणात मागणी असते. मात्र त्या प्रमाणात खव्याची उपलब्धता होत नसल्याने मागणी आणि पुरवठा यात समन्वय साधण्यासाठी व्यापाऱ्यांकडून स्वीट, हलवा, बर्फी या नावाने खवा सदृश्य अन्नपदार्थाचे वितरण होत असल्याचे निदर्शनास येते. या प्रकारांना आळा घालण्यासाठी तसेच दिवाळीच्या सणात उपयोगात आणल्या जाणाऱ्या विविध अन्नपदार्थाचा गुणवत्ता व दर्जा तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.
हेही वाचा- गुंड गणेश जाधव हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक
या मोहिमेअंतर्गत शुक्रवारी कल्याण पश्चिम येथील काळा तलाव येथे डीडी ०१- जी ९६९५ या क्रमांकाच्या ट्रकमधून २५ लाख ८२ हजार ८१६ रुपये किंमतीचा खवा आणि खवा सदृश्य पदार्थ जप्त करण्यात आला आहे. तर भिवंडी येथील फुलेनगर परिसरात असलेल्या मेसर्स शेफ शुभ कुकिंग ऑईलच्या गोदामातून ६ लाख ८१ हजार ९१८ रुपये किंमतीचे ६ हजार ६६७ किलो खाद्यतेल जप्त करण्यात आले आहे. तसेच कोणत्याही अन्नपदार्थाच्या गुणवत्ता व दर्जाबाबत किंवा अन्न आस्थापनाबाबत कोणतीही तक्रार असल्यास १८००२२२३६५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कोकण विभागाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त सुरेश देशमुख यांनी केले आहे.