लोकसत्ता प्रतिनिधी
बदलापूर : नुकत्याच पार पडलेल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारताच्या महिला संघाने अद्वितीय कामगिरी करत चषकावर आपले नाव कोरले. या संपूर्ण स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बदलापूरच्या रेश्मा राठोड हिचाही मोठा वाटा होता. बदलापूरच्या शिवभक्त शाळेचे विद्यार्थिनी असलेल्या रेश्माचा गुरुवारी शाळेने मिरवणूक काढून गौरव केला. बदलापूर शहरात निघालेल्या या मिरवणुकीत अनेक बदलापूरकर रेश्माचे कौतुक करत होते.
बदलापूर शहर काही वर्षांपूर्वी खो खो खेळासाठी प्रसिद्ध होते. अनेक स्पर्धांमध्ये बदलापूरचे खेळाडू चमकत होते. काही वर्षांपूर्वी बदलापुरातील दोन विद्यार्थिनींना शिवछत्रपती पुरस्कार मिळाला. हा पुरस्कारही खो खो खेळासाठीच होता. खो-खो खेळाचा विश्वचषक नुकताच संपन्न झाला. पहिल्या विश्वचषक स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष अशा दोन्ही संघांनी विजय मिळवला. महिला संघाने बलाढ्य नेपाळवर ७८-४० अशी मात केली. या स्पर्धेत सर्वच महिला खेळाडूंचे योगदान अमूल्य होते. सोबतच देशभर या महिला खेळाडूंचे कौतुक झाले.
भारताच्या महिला खो खो संघात बदलापूरच्या रेश्मा संतोष राठोड हिचाही समावेश होता. रेश्माने संपूर्ण स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. त्यामुळे तिला गौरविण्यातही आले होते. विश्वचषक जिंकल्यानंतर रेश्मा राठोडचे कौतुक होत होते. बदलापुरातील शिवभक्त विद्यामंदिर शाळेची माजी विद्यार्थी असलेली रेश्मा हिच्या गौरवासाठी गुरुवारी बदलापुरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहरभर ही मिरवणूक जात असताना ठिकठिकाणी रेशमाचे कौतुक केले जात होते.
शिवभक्त विद्या मंदिरचे प्रमुख आणि कोकण शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, शिवसेनेचे माजी नगरसेवक श्रीधर पाटील यावेळी उपस्थित होते. खुल्या जीप मधून रेश्माची मिरवणूक सुरू होती. शिवभक्त विद्यामंदिचे शेकडो विद्यार्थ्यांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला अनेक विद्यार्थी, नागरिकांनी यावेळी मिरवणुकीत ठेका धरला. रेश्मा राठोड ही उल्हासनगरच्या एसएसटी महाविद्यालयाची पदवीधर विद्यार्थिनी होती. रेशमाचे वडील संतोष राठोड ट्रक चालक असून तिची आई गृहिणी आहे. त्यानंतरही परिस्थितीवर मात करत रेशमाने केलेल्या कामगिरीचे शहरभर कौतुक होते आहे.