कल्याण – कल्याण पूर्वेतील नांदिवली तर्फ गाव हद्दीतून गायी चारण्यासाठी गेलेल्या एका १५ वर्षांच्या गुराख्याचे अज्ञात इसमांनी गुरुवारी सकाळी अपहरण केले आहे. सकाळी गायी चारण्यास घेऊन गेलेला गुराखी घरी का आला नाही म्हणून कुटुंब प्रमुखाने चौकशी केली तेव्हा त्यांना गुराखी गायब असल्याचे आढळले.
शिवा बिचप्पा कुरूवलम (१५) असे अपहरण झालेल्या गुराख्याचे नाव आहे. शिवा कुरूवलम याला कोणीहा वारस नसल्याने आणि तो अनाथ असल्याने कल्याण पूर्वेतील नांदिवली तर्फ गावातील भास्कर बारकू ढोणे (४८) यांनी या मुलाचा सांभाळ केला. त्याला मोठे केले. भास्कर यांच्याकडे गोधन आहे. या गोधनातून ते दुग्ध व्यवसाय करतात. आपल्या गायी सांभाळण्यासाठी, चरायला नेण्यासाठी भास्कर ढोणे शिवा याला गाव परिसरातील माळरानावर पाठविते होते. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी शिवा गायी घेऊन नांदिवली गाव हद्दीतील स्मशानभूमीजवळील माळरानावर गेला. गायी चरत असताना शिवा याच भागातील खडकाळ भागावर बसून राहत असे.
हेही वाचा – कल्याणमधील अटाळीत अल्पवयीन कार चालकाची मोटीराला धडक
गुरुवारी सकाळी गायी चारत असताना कोणीतरी अज्ञात इसमाने शिवा कुरूवलम याला फूस लावून पळवून नेले. शिवा नियमित अकरा वाजेपर्यंत गायी घरी घेऊन येत होता. पण तो घरी आला नाही. म्हणून कुटुंब प्रमुख भास्कर ढोणे नांदिवली भागातील माळरानावर गेले. तेव्हा त्यांना तेथे त्यांच्या गायी चरत असल्याचे दिसले. पण परिसरात शिवा त्यांना आढळला नाही. त्यांनी परिसरात शिवाचा शोध घेतला. तो आढळून आला नाही. शिवाच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन त्याचे कोणीतरी अपहरण केले असल्याचा संशय व्यक्त करून ढोणे यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एम. माने तपास करत आहेत.
© The Indian Express (P) Ltd