ठाणे : तीन हजार डाॅलर असे मासिक वेतनाचे अमीष दाखवून ठाण्यातील वागळे इस्टेट येथील एका तरुणाला थायलँड या देशात डांबण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तसेच त्याच्या सुटकेसाठी कुटुंबियांकडून तीन हजार डाॅलरची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी तरुणाच्या भावाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : विश्लेषण : ‘आदिपुरुष’वर खरंच बंदी घातली जाऊ शकते का? सेन्सॉर बोर्डचे नियम जाणून घ्या
दरम्यान, ठाणे पोलिसांनी आता दुतावासास संपर्क साधण्यास सुरूवात केली आहे. मुंबईतील डोंगरी आणि वांद्रे येथेही असाच गुन्हा दाखल आहे. या तरुणांना त्याठिकाणी आभासी चलनाद्वारे नागरिकांची फसवणूक करण्याचे काम दिले गेले आहे. त्यामुळे या देशात अशाचप्रकारे आणखी काही भारतीय तरुणांना डांबण्यात आले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा : चीनला ‘जशास तसे’ उत्तर का नाही ?
फसवणूक झालेला ३१ वर्षीय मुलगा आई-वडिल आणि भावासोबत वागळे इस्टेट भागात राहत होता. त्याचे पत्रकारितेत पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले असून तो नोकरीच्या शोधात होता. सुमारे महिन्याभरापूर्वी तरुणाच्या भावाला त्याच्या मित्राने थायलँड येथे डिजीटल मार्केटिंग या क्षेत्रात एका कंपनीमध्ये नोकरी उपलब्ध असून कोणी इच्छूक असल्यास कळवावे, असे सांगितले होते. त्यावेळी त्याच्या भावाने त्याचा मोबाईल क्रमांक मित्राला दिला. त्यानंतर मित्राने तरुणाला संपर्क साधून बायोडेटा मागवून घेतला. हा बायोडेटा मित्राने मिसम हुसेन नावाच्या व्यक्तीकडे पाठवला. काही दिवसांनी मिसम याने तरुणाला व्हिडीओ काॅल करुन त्याची मुलाखत घेऊन त्याची नोकरी मंजूर केली. काही वेळात बिलीयन डेज कंपनीमध्ये एक हजार अमेरिकन डाॅलर अशी मासिक वेतनाची नोकरी मिळाल्याचे पत्र तरुणाला त्याच्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त झाले.
हेही वाचा : कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ ‘पोलीस’ वाहन कोंडी
थायलँडला जाण्यासाठी तरुणाचे २० सप्टेंबरचे विमान तिकीट नोंदविण्यात आले. त्यावेळी मुंबईतील डोंगरी येथील एक तरुणही त्याच्या सोबत होता. हे दोघेही थायलँड येथील बँकाॅक येथे पोहचल्यानंतर त्यांना चीन मधील आणखी एक तरुण भेटला. या तिघांचे वर्क विसा कंपनीने बनविले. २५ सप्टेंबरला या तिघाही तरुणांना एका खासगी वाहनाने चार ते पाच तासांचे अंतर पार करून एका जंगलाच्या ठिकाणी नेले. तेथील नदीपार करुन एका जागेत सोडण्यात आले. ही सर्व माहिती तरुणाने त्याच्या भावाला दिली होती. परंतु त्यानंतर त्याचा संपर्क कुटुंबियांसोबत होत नव्हता.
अचानक ३ ऑक्टोबरला तरुणाने त्याच्या भावाला व्हाॅट्सॲप काॅल करून आपली फसवणूक होत असल्याची माहिती दिली. तसेच या कंपनीचे नाव बिलीयन डेज नसून के.के. कंपनी नाव आहे. यामध्ये आम्हाला मुलींच्या नावाने खोटे खाते तयार करून एक संहिता दिली जाते. त्यानंतर विविध ठिकाणच्या नागरिकांना अभासी चलन खरेदी करण्यास सांगून त्यांची फसवणूक केली जात असल्याची माहिती त्याने दिली. तसेच आमची येथून सुटका करा अशी विनंती त्याने केली.
त्यानंतर तरुणाच्या भावाने घडलेला प्रकार त्याच्या मित्राला सांगितला. मित्राने मिसमला संपर्क साधला असता, त्याने तरुणाला सोडवायचे असल्यास तीन हजार अमेरिकन डाॅलरची मागणी केली. या गंभीर प्रकारानंतर तरुणाच्या भावाने सुटकेसाठी विदेश मंत्रालय आणि मुख्यमंत्री कार्यालयास ई-मेलद्वारे संपर्क साधला आहे. तसेच त्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी श्रीनगर पोलिसांना संपर्क साधला असता, थायलँडमध्ये अद्याप किती जण अडकले आहेत. याची माहिती मिळालेली नाही. परंतु आम्ही भारतीय दुतावासाला संपर्क साधून या तरुणांना सोडविण्याची विनंती करणार आहोत. अशी माहिती त्यांनी दिली.