मुलांना त्यांच्या जडणघडणीच्या काळात जर सातत्याने वैविध्यपूर्ण अनुभव दिले गेले तर त्यातून त्यांचा सर्वागीण व्यक्तिमत्त्व विकास होऊ शकतो. अनुभव घेण्याच्या या प्रक्रियेतून मुलांच्या विविध क्षमता विकसित होत असतात.
ठाण्यातील जिज्ञासा संस्थेने १९९३च्या उन्हाळी सुट्टीमध्ये एक धमाल शिबीर आयोजित केले. त्यातील शिबिरार्थीनी आपापल्या डायरीत मनोगते लिहिली होती. त्या लिखाणाचा दर्जा पाहता त्यावर एक अंक काढण्याची आवश्यकता सुरेंद्र दिघेसरांना वाटू लागली. त्यातूनच मुलांनी, मुलांसाठी काढलेले मासिक अशी कल्पना उदयास आली. ग्रंथालीचे दिनकर गांगल यांनी ही कल्पना उचलून धरली. या मुलांसाठी एक मार्गदर्शनपर शिबीर आयोजित करण्याचे निश्चित झाले. मासिकाच्या पूर्वतयारीसाठी त्यावर्षी जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी शिबिरे आयोजित करण्यात आली. साधारणपणे दर शनिवार-रविवारी मुलांशी दोन तास संवाद साधला जायचा. मनमोकळी चर्चा व्हायची. बातमी म्हणजे काय, लेख म्हणजे काय, बातमी कशी लिहावी (पाल्हाळ न लावता नेमकेपणे कशी लिहावी), सुरुवात आणि शेवट कसा करावा, परिपूर्ण लेखन कसे असते, व्यक्ती- संस्था अथवा एखाद्या उपक्रमाविषयी लिहिताना कसे लिहावे, लेखन करताना कोणती पथ्ये पाळावीत, इ. मुद्दय़ांना धरून संवाद रंगायचे. विचारांची देवाण-घेवाण व्हायची. दिनकर गांगल यांच्यासारख्या या क्षेत्रातील जाणकाराबरोबरच अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी या शिबिरांमधून मुलांशी संवाद साधला. त्याबरोबरच ललित, क्रीडा, कला, सामाजिक इ. विविध लेखन प्रकारही समजून घेता आले. मुलांचे लेखन या ज्येष्ठ मंडळींनी तपासून दिले. त्यानुसार मुलांनी पुनर्लेखन केले.
मुलांनी, मुलांसाठी काढलेले मुलांचे मासिक हे या नियतलिकाचे वैशिष्टय़ कटाक्षाने पाळण्यात आले. त्या वेळी स. वि. कुलकर्णी, चितळेसर, मुकुंदराव दामले, यशवंत साने, मधुकर नाशिककर अशा मान्यवरांची सल्लागार समिती नेमण्यात आली. विद्यार्थ्यांची संपादकीय समिती नेमून कामाची विभागणी केली जाते. अंकात कोणते लेख असावेत याविषयी चर्चा करून मग आलेल्या लेखांवर चर्चा होते. त्यातून अंकासाठी लेखांची निवड केली जाते. संपादकीयसुद्धा मुलेच लिहितात. ललित, कथा, कविता, स्वत:चे अनुभव, माहितीपर, विज्ञानविषयक, एखाद्याच्या उत्तम चित्रपटाचे, नाटकाचे वा पुस्तकाचे रसग्रहण, शालेय वृत्त, विनोदी लेखन, ठाण्यातील विविध कार्यक्रम, आगामी अंकाचे आकर्षण असे मासिकाचे स्वरूप असते. ठाण्यातील विविध व्यक्ती, संस्था राबवीत असलेल्या उपक्रमांना भेटी देऊन विद्यार्थी त्याचे वृत्त मासिकात लिहितात. लेखन कौशल्यांबरोबरच कॉलम, ले-आऊट, मुद्रित शोधन (प्रूफ रीडिंग), छपाई या मासिकाच्या इतर अंगांची माहितीही विद्यार्थ्यांना करून दिली जाते. मुलांना त्यांचे विचार त्यांच्या पद्धतीने मांडण्याचे स्वातंत्र्य दिले जाते. पहिल्या वर्षी दोन अंक काढण्यात आले.
या उपक्रमात मुलांना शेअर मार्केट, एशियाटिक लायब्ररी, सोनाराची पेढी आदी अनेक ठिकाणी नेण्यात आले. मासिकाचे अपरिहार्य अंग म्हणजे जाहिराती. मुले जाहिरातीही गोळा करतात. ठाण्यातील वेध व्यवसाय परिषदेत अनेक नामवंतांच्या मुलाखती होतात. त्यापैकी हेमंत करकरे, आमिर खान, महेश मांजरेकर आदींच्या मुलाखती मुलांनी घेतल्या. कविवर्य कुमुसाग्रज आणि सचिन तेंडुलकर यांची प्रत्यक्ष भेट आणि संवाद या विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय अनुभव ठरला. वनखात्याच्या व्याघ्रगणना मोहिमेतही या मुलांनी भाग घेतला होता.
गेल्या काही वर्षांत परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला. गुणांच्या जीवघेण्या स्पर्धेमुळे मुलांना या उपक्रमासाठी पूर्वीइतका वेळ देता येत नाही.त्यामुळे अंकही पूर्वी त्रमासिक, सहामाही आणि आता वार्षिक असा बदलत गेला. तरीही गेली २२ वर्षे सातत्याने हा उपक्रम नेटाने सुरू आहे. १९९९ मध्ये शालेय जिज्ञासाची इंटरनेट आवृत्ती काढण्यात आली. तीन वर्षांपूर्वी ‘जगू या स्वच्छंदे परि विवेके’ ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी उद्घाटन केलेल्या या कार्यशाळेत डॉ. आनंद नाडकर्णी, उदय निरगुडकर, वसंत लिमये आदींनी मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे मुल अधिक सखोल आणि चौफेरपणे विचार करू लागले. गुणांची स्पर्धा अपरिहार्य असली तरी एकूणच व्यक्तिमत्त्व विकासासाठी अशा प्रकारच्या शाळाबाह्य़ उपक्रमांची खूपच आवश्यकता आहे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा