डोंबिवली- डोंबिवली एमआयडीसीतील एका कंपनीच्या सुरक्षा रक्षकाची मध्यरात्री भंगार चोरीसाठी चार भंगार चोरांनी हत्या केल्याचा प्रकार मानपाडा पोलिसांनी उघडकीला आणला. एका रिक्षेच्या पाठीमागे लिहिलेल्या फलकावरून पोलिसांनी संबधित रिक्षा चालकाला अटक केला. आणि या हत्येचा उलगडा करून दोन आरोपींना अटक केली. फरार दोघांचा शोध पोलीस घेत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एमआयडीसीतील विजय पेपर प्राॅडक्ट या बंद कंपनीच्या ग्यानबहादुर गुरूम (६४) या सुरक्षा रक्षकाची बुधवारी रात्री कंपनी आवारात हत्या करण्यात आली होती. जसवंतसिंग ठाकुर यांनी याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला होता.

विजय पेपर प्राॅडक्ट कंपनी भागातील सीसीटीव्ही चित्रण पोलिसांनी ताब्यात घेतले. या चित्रिकरणात पोलिसांना विजय कंपनी जवळ मध्यरात्रीच्या वेळेत तीन जण रिक्षेतून आलेले दिसतात. या रिक्षेच्या पाठीमागे एबीपी माझा परिवाराकडून एबीपी वेडिंग नावाचा फलक होता. असा फलक असलेल्या रिक्षेचा शोध पोलिसांनी कल्याण, डोंबिवली भागातून घेतला. एका रिक्षेचा मागे फलक असलेला भाग कापला असल्याचे दिसले. पोलिसांना त्या रिक्षा चालकावर संशय आला. पोलिसांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. तो पळून गेला. त्याचा पाठलाग करून पोलिसांनी त्याला पकडले. रिक्षा चालकाचे नाव टोनो डिसिल्व्हा उर्फ शिवा सोमा हिलम (रा. सूचकनाका, कल्याण पूर्व) आहे. त्याने विजय पेपर कंपनीच्या सुरक्षा रक्षकाची हत्या तीन साथीदारांच्या साहाय्याने केल्याची कबुली पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याने दिलेल्या माहितीवरून फिरोज इस्माईल खान (३०, कोळसेवाडी, कल्याण) याला अटक केली.

पोलिसांनी सांगितले, तीन जण रिक्षेतून विजय कंपनीत भंगार चोरीच्या उद्देशाने आले. कंपनी कार्यालयाचा दरवाजा तोडत असताना सुरक्षा रक्षक ग्यानबहादुर यांना जाग आली. त्यांनी चोर म्हणून मोठ्याने ओरडा केला. या ओरड्याने आपण सापडले जाऊ या भीतीने तिघांनी लोखंडी तुकडा ग्यानबहादुर यांच्या डोक्यात मारला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तिन्ही भंगार चोरांनी सुरक्षा रक्षकाजवळील कार्यालयाच्या चाव्या काढुन घेतल्या. कार्यालय उघडून त्यामधील कासा, तांबे,पितळ धातुचे भंगार साहित्य, धातुची रिळे , ग्यानबहादुरचा मोबाईल असा एकूण दीड लाखाचा ऐवज चोरून नेला. चोरीचे सामान चोरट्यांनी कोळसेवाडीतील भंगार विक्रेता फिरोज खान याला १० हजार रूपयांना विकले. आलेले पैसे चोघांनी वाटून घेतले. फरार दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक पडवळ, साहाय्यक निरीक्षक अविनाश वनवे, अनिल भिसे, सुरेश डाबरे, सुनील तारमळे, हवालदार राजेंद्र खिलारे, भानुदास काटकर, यलमा पाटील, देवा पवार, विनोद ढाकणे, संजु मसाळ, शांताराम कसवे, प्रशांत वानखेडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Killed dombivali stealing scrap metal two wreck thieves arrested amy