शहापूर : क्षुल्लक कारणावरून सहा जणांच्या टोळक्याने दिलीप शंकर खूपसे (४५) यांची निघृण हत्या केल्याची घटना शहापूर तालुक्यातील हिव गावात घडली. रविवारी रात्री उशीरा एक वाजता घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

तालुक्यातील हिव गावातील दिनेश खूपसे यांच्या टेम्पोची शेजारच्या खुटघर गावातील कैलास शेळके, काळुराम बसवंत, निखिल भांडे, योगेश चव्हाण, जयेश डुकरे तसेच हिव गावातील अमोल धामणे या सहा जणांच्या टोळक्याने तपासणी केली होती. यामुळे दोघांमध्ये वाद झाले होते. या वादातून दिनेशचे काका दिलीप खूपसे यांना या सहाजणांनी लाठी, दंडुक्याने मारहाण केली. त्यानंतर त्यांनी चाकूने वार हल्ला करून त्यांची हत्या केली. याप्रकरणी कैलास शेळके, काळुराम बसवंत, निखिल भांडे, योगेश चव्हाण, जयेश डुकरे, अमोल धामणे या  सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी दोघांना तपासाकरीता ताब्यात घेतले असून चार जण फरार झाले आहेत. त्यांचा शोध सुरु आहे. हत्येचे कारण अधिक चौकशी नंतर तपशीलाने लवकरच स्पष्ट होईल, असे शहापूर पोलीसांनी सांगितले.

Story img Loader