बदलापूरः कुळगाव बदलापूर नगरपालिका, महिला व बालकल्याण विभाग आणि प्रधानमंत्री खजीन क्षेत्र योजनेअंतर्गत महिलांना शिलाई यंत्रे आणि घरघंटीचे वाटप करण्यात आले होते. मात्र या कामात आर्थिक देवाण घेवाण करत दलालांच्या मार्फत काही महिलांचे अर्ज बाद केल्याचा खळबळजनक आरोप मंगळवारी आमदार किसन कथोरे यांनी विधानसभेत केला. याप्रकरणी चौकशी करून कारवाई करणार का असा प्रश्न त्यांनी लक्ष्यवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला. एकाच घराच दोन दोन मशिन वाटले गेले असाही आरोप कथोरे यांनी यावेळी केला. यंदाच्या अधिवेशनात दुसऱ्यांदा मांडलेल्या या विषयावरून शहरात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
वर्ष २०२४ मध्ये कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रातील महिलांना घरघंटी आणि शिलाई यंत्राचे वाटप करण्यात आले होते. या प्रस्तावाला २८ फेब्रुवारी २०२४ रोजी मान्यता देण्यात आली. मात्र महिला लाभार्थी निवड करताना आर्थिक देवाण घेवाण झाल्याचा आरोप मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी मंगळवारी विधानसभेत केला. लक्ष्यवेधी मांडत त्यांनी या प्रक्रियेतील अनेक बाबींवर आक्षेप नोंदवला. या प्रक्रियेत दलालांच्या मार्फत काही महिलांचे अर्ज बाद केले, असे कथोरे यावेळी म्हणाले. ठराविक पक्षाच्या माध्यमातून पात्र महिला निवडण्याचे काम केले गेले असेही कथोरे म्हणाले. याबाबत प्रशासकांना लेखी पत्र दिले होते. त्यात चौकशीपर्यंत शिलाई यंत्रे आणि घरघंटी वाटप थांबवण्याची मागणी केली होती.
मात्र त्यानंतरही कुणाच्या तरी दबावाखाली हे वाटप करण्यात आले, असेही कथोरे यावेळी म्हणाले. त्यामुळे शिलाई यंत्रे आणि घरघंटी वाटप करणाऱ्या महिला बाल कल्याण अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यात काही दलालांचा सहभाग होता. त्यांच्या माध्यमातून पात्र महिलांची निवड करण्यात आली असाही दावा कथोरे यांनी केला. काही महिलांचे अर्ज अपूर्ण दाखवण्यात आले. काही अर्ज गहाळ करण्यात आले. काही घरांमध्ये दोन दोन यंत्रे देण्यात आली. हा इतर महिलांवर अन्याय आहे, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. शिलाई यंत्रे आणि घरघंटी खरेदीचे काम कुणाला दिले आहे, त्यात चढ्या दराने यंत्रांची खरेदी केली आहे असे सांगत या अधिकाऱ्यांची चौकशी करणार का, असाही प्रश्न किसन कथोरे यांनी उपस्थित केला.
यावर बोलताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आपल्या उत्तरात यंत्रे खरेदीचा प्रश्न नाही, असे स्पष्ट केले. यात लाभार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम दिली जाते. त्यामुळे यासाठी संस्था नेमण्याचा प्रश्नच नाही, असे सामंत म्हणाले. यासाठी अडीच कोटींच्या अधिन राहून वाटप करायचे होते. अर्ज अधिक असल्याने याबाबत सोडत काढण्यात आली. मात्र आमदारांच्या मागणीनुसार यात काही असल्यास चौकशी करू, असे सामंत म्हणाले.
राजकारण तापणार
कुळगाव बदलापूर नगरपालिकेत शिवसेनेचे वर्चस्व आहे. प्रशासकीय राजवटीतही शिवसेनेच्या वामन म्हात्रे यांचे पालिकेवर वर्चस्व आहे. पालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पणावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाचारण करत म्हात्रे यांनी कुरघोडीचा प्रयत्न केल्याची चर्चा होती. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार किसन कथोरे आणि वामन म्हात्रे यांच्या मोठा संघर्ष दिसून आला. त्यानंतर कथोरे – म्हात्रे यांनी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. महिलांना शिलाई यंत्रे आणि घरघंटी वाटपात म्हात्रे यांनी पुढाकार घेतला होता, अशी चर्चा आहे. त्यामुळे याच विषयावर कथोरे यांनी बोट ठेवत पालिकेच्या माध्यमातून म्हात्रे यांना कोंडीत पकडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
आमदारांचे आरोप अज्ञानातून
आमदार किसन कथोरे यांनी महिलांना वाटप करण्यात आलेल्या शिलाई मशिन आणि घरघंटीबाबत केलेले आरोप अज्ञानातून केलेले आहेत. त्यांनी पूर्ण माहिती घ्यायला हवी. सर्व पक्षिय पदाधिकाऱ्यांनी महिलांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून पुढाकार घेतला होता. यात त्यांच्या पक्षाचे पदाधिकारीही सक्रीय होते. मुख्य कार्यक्रमातही सर्वपक्षीय सदस्यांनी सहभाग नोंदवला होता. पारदर्शक पद्धतीने पालिकेने लॉटरी काढली होती. आता शेकडो महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. त्यावर शंका उपस्थित करणे चुकीचे आहे.- वामन म्हात्रे, शहरप्रमुख, शिवसेना</strong>