बदलापूरः एकेकाळी एकाच पक्षात राहूनही एकमेकांविरुद्ध भूमिका घेणारे भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील आणि मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्यात विस्तवही जात नव्हता. मात्र सध्या लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने कपिल पाटील यांना मत देण्यासाठी बदलापूर शहरात आमदार किसन कथोरे यांच्या वतीने विशेष आवाहन पत्र घरोघरी पोहोचवले जाते आहे. यावर किसन कथोरे यांचे मनोगत आहे. माझ्या विकासाला जगन्नाथरूपी रथाचे साथीदार कपिल पाटील आहेत. बदलापूरच्या विकासासाठी माझ्या खांद्याला खांदा लावून ते काम करतात, त्यामुळे त्यांना विजयी करा असे आवाहन कथोरे यांनी पत्राद्वारे केले आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार आणि केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील तिसऱ्यांदा लोकसभेच्या रिंगणात उमेदवार म्हणून उतरले आहेत. सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पाटील दर एक किंवा दोन दिवसांनी बदलापूर शहरात येत असतात. भाजपसह मित्र पक्षही पाटील यांच्यासाठी प्रचारात उतरले आहेत. स्थानिक आमदार किसन कथोरे यांनीही पाटील यांचा प्रचार सुरू केला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून कपिल पाटील यांना मतदान करण्यासाठी केलेल्या स्वतंत्र आवाहन पत्राची चर्चा सध्या बदलापुरात रंगली आहे.
आमदार किसन कथोरे यांनी कपिल पाटील यांना मतदान करण्यासाठी विशेष आवाहन पत्र तयार केले आहे. त्याचे वाटप सध्या बदलापूर शहरात भाजपचे कार्यकर्ते घरोघरी करत आहेत. मात्र अशा स्वतंत्र आवाहन पत्रामुळे अनेक चर्चा रंगल्या आहेत. आमदार किसन कथोरे आणि खासदार कपिल पाटील यांच्यात मधल्या काळात विसंवाद होता. दोन्हीही भाजपचे नेते असले तरी एकमेकांविरुद्ध अप्रत्यक्ष टीका टिपणी करत होते. त्यामुळे भाजपातच दोन गट पडल्याचे दिसत होते. त्यानंतर अचानक किसन कथोरे यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावत कपिल पाटील यांनी आमच्यात आता वाद नसल्याचे दाखवून दिले होते. मात्र त्यानंतरही त्यांच्यात संवाद नसल्याची चर्चा होती.
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर होताच कपिल पाटील यांनी मात्र कथोरे यांचीच भेट घेत प्रचार सुरू केल्याचे जाहीर केले होते. गेल्या काही दिवसांपासून दोघेही प्रचाराच्या निमित्ताने सोबत आहेत. त्यातच कथोरे यांनी पाटील यांना मतदान करण्यासाठी आता आपले मनोगताचे पत्र जाहीर केले आहे. बदलापूर शहराचा सर्वांगीण विकास ही माझी तळमळ आहे. त्यासाठी आपण साातत्याने मला आणि आपले लाडके खासदार, केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांना शहरातील विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सतत सहकार्य करीत आहात. वेळोवेळी आपले मोलाचे सहकार्य लाभल्यामुळे कालचे बदलापूर आणि आजचे विविध विकासकामांच्या पूर्तीनंतरचे बदलापूर शहर व परिसर यात आपले सहकार्य व आशीर्वादाचे योगदान मोठे आहे, असा मजकूर त्यात लिहिण्यात आला आहे.
हेही वाचा – रेल्वे पुलाच्या कामासाठी डोंबिवली फलाट एकवरील आरक्षण केंद्र कल्याण बाजुला
माझ्या विकासाला जगन्नाथरुपी रथाचे साथीदार केंद्रीय राज्यमंत्री व खासदार कपिल पाटील आहेत. आपल्या बदलापूर शहराच्या विकासासाठी माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारे कपिल पाटील हे महायुतीचे उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांना मतदान करावे असे आवाहन कथोरे यांनी पत्राद्वारे केले आहे. या पत्रामुळे अनेक चर्चा शहरात रंगल्या आहेत.