बदलापूरः माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या रूपाने स्वपक्षिय छुपे आव्हान आणि महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेच्या वामन म्हात्रे यांची नाराजीतून प्रचारातून माघार यामुळे कधी नव्हे ते आव्हानात्मक झालेल्या मुरबाड विधानसभा मतदारसंघात भाजपचे किसन कथोरे ५० हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. २० व्या फेरीअखेर किसन कथोरे यांना १ लाख ४४ हजार मते होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या सुभाष पवार यांना ९४ हजार ४३४ मते होती. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जातो आहे.
मुरबाड विधानसभा मतदारसंघात चौथ्यांदा विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या आमदार किसन कथोरे यांच्यासाठी यंदाही निवडणुक काही अंशी कठीण मानली जात होती. लोकसभा निवडणुकीनंतर पराभूत झालेल्या केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा रोष, त्यांचा समर्थकांची उघड नाराजी, त्यातच महायुतीतीत शिवसेना पक्षाच्या बदलापूर शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी प्रचारातून माघार, शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी उघडपणे केलेला विरोधी उमेदवाराचा प्रचार अशा सर्व विरोधकांवर मात करत किसन कथोरे यांनी मुरबाड विधानसभा मतदारसंघात पुन्हा विजयी आघाडी धेतली आहे.
आणखी वाचा-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर आनंदोत्सव; कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी
१९ व्या फेरीत किसन कथोरे यांना १ लाख ३८ हजार मते मिळवली होती. तर त्यांच्या विरोधी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या सुभाष पवार यांना ८८ हजार १८१ मते मिळाली होती. तर २० व्या फेरीत किसन कथोरे यांना १ लाख ४४ हजार मते मिळाली होती. तर सुभाष पवा यांना ९४ हजार ४३४ मते मिळाली. त्यामुळे २० व्या फेरीअखेर किसन कथोरे ५० हजार २३७ मतांनी आघाडीवर होते. किसन कथोरे यांचा विजय निश्चित मानला जातो आहे.
© The Indian Express (P) Ltd